|| शैलजा तिवले

ताज्या पोषण आहाराचा अभाव, टाळेबंदीमुळे कुटुंबाची कोलमडलेली आर्थिक स्थिती आणि अंगणवाडीकडून काही ठिकाणी दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा शिधा यामुळे राज्यातील कुपोषणात करोना साथीच्या काळात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विशेषत: आदिवासी भागात शून्य ते पाच वयोगटातील कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण साडेतीनवरून साडेपाच टक्क्य़ांपर्यंत वाढले आहे.

राज्यात शून्य ते पाच वयोगटातील ५८ लाख बालकांच्या वजनाची नोंद अंगणवाडीत केली जाते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यातील कमी वजनाच्या बालकांच्या प्रमाणात उत्तरोत्तर वाढ होत आहे. करोना काळात हा आलेख वाढला आहे. आदिवासी भागात कमी वजनाच्या बालकांची टक्केवारी जानेवारी ते जून या कालावधीत साडेचार टक्क्य़ांवरून साडेपाच टक्क्यांवर पोहचली आहे. राज्यात हे प्रमाण दोनवरून अडीच टक्क्य़ांपर्यंत वाढले आहे. मध्यम वजनाच्या बालकांचे प्रमाणही आदिवासी भागात १५ वरून १७ टक्कय़ांवर गेले आहे.

करोनाकाळात वजनाची नोंद केलेल्या बालकांच्या प्रमाणातही मोठी घट झाली आहे. टाळेबंदीनंतर एप्रिल, मे आणि जून काळात ५८ लाख बालकांपैकी निम्म्याहून कमी बालकांच्या वजनांची नोंदणी झाली. आदिवासी भागातही हीच स्थिती आहे. मार्चपासून अंगणवाडय़ा बंद करण्यात आल्या. अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या ताज्या पोषण आहाराऐवजी बालके आणि गरोदर मातांना घरोघरी दोन महिन्यांचा कोरडा शिधा एकाच वेळेस पुरविला जात आहे. आर्थिक स्थिती बिकट बनल्याने बालकांसाठीचा शिधा संपूर्ण कुटुंबाची भूक शमविण्यासाठी वापरला जात असल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, करोनाकाळात जगभरात १४ टक्क्य़ांनी कुपोषणात वाढ होईल, असा अंदाज काही अभ्यासांमधून मांडण्यात आला आहे. या काळात वाढलेली बेरोजगारी, बिकट आर्थिक स्थिती आणि महागाई याचा परिणाम घरात बालकाला मिळणाऱ्या पोषण आहारावर होणार, अशी शक्यता होतीच. आता वाढलेल्या कुपोषणाबाबत अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. मृदुला फडके यांनी व्यक्त केले.

कारणे काय?

अंगणवाडीत मूल दोन वेळेस गरम आहार पोट भरून खाते. परंतु आता पुरेसे अन्न मिळत नसल्याने काही बालकांची वजने कमी झाल्याचे नाशिकच्या सुरगणा या आदिवासीबहुल भागातील अंगणवाडीसेविकेने सांगितले.

इथले बहुतांश लोक शहरात कामाला जातात, परंतु करोना काळात हाताला काम नाही आणि घरात खायला नाही, अशी स्थिती असल्याने बालकांसाठीचा शिधा कुटुंबातील अन्य सदस्यांसाठीही वापरण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बालकांची वजने कमी होत असल्याचे निरीक्षण नंदुरबारच्या अंगणवाडीसेविकेने नोंदविले.

काही वेळेस शिधा चांगला येतो, तर काही वेळेस अत्यंत खराब असतो. धान्यात किडे असतात. लोक नाइलाजाने घरी घेऊन जातात, परंतु शिजवून खातातच असे नाही, असे नाशिकच्या अंगणवाडीसेविकेने सांगितले.

राज्यात टाळेबंदीच्या काळात कुपोषण काही अंशी वाढले आहे. जुलैपासून नियमितपणे गटागटात वजनाची नोंदणी सुरू केली आहे. अतिकुपोषित असलेल्या बालकांच्या तपासण्या, देखरेख करण्याचे निर्देश वारंवार दिले जात आहेत.  – इंद्रा मालो, आयुक्त, एकात्मिक विकास सेवा योजना