मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा महाविद्यालयाकडे सोपवून आता कमी गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. हे गुण देण्याचे अधिकारही महाविद्यालयांकडेच असणार आहेत.

मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवली. परीक्षेचे स्वरूपही बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचे केले. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका महाविद्यालयाचे समूह काढणार आहेत. काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रश्नसंचही वाटले आहेत. आता विद्यार्थ्यांना वाढीव गुण (ग्रेस गुण) देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. हे गुण कुणाला द्यावेत याचे निकषही महाविद्यालये ठरवणार आहेत. यासाठी विद्यापीठाने निकष दिलेले नाहीत समूहातील प्रमुख महाविद्यालयाने याबाबत निर्णय घ्यायचा आहे.

यापूर्वी सविस्तर उत्तरे द्या अशा स्वरूपातील परीक्षा होत असे. त्यावेळी काठीण्य पातळीचा विचार करून विद्यार्थ्यांना वाढीव गुण देणे सोपे जात होते.

मात्र आता बहुपर्यायी प्रश्न असल्याने हे गुण नेमके कसे द्यायचे, त्याचे सूत्र काय असेल हे विद्यापीठाने स्पष्ट करावे. असे गुण देण्यात एकसूत्रता असावी असे मत एका प्राचार्यानी व्यक्त केले.