संदीप आचार्य

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील वाढते प्रदूषण ही दिवसेंदिवस चिंतेची बाब बनली असून या प्रदूषणामुळे श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली असून या आजाराने २०१८ मध्ये तब्बल ४९२ लोकांचा मृत्यू झाला आहे. श्वसनविकाराच्या रुग्णांची संख्या एकटय़ा राजधानीत वाढलेली नसून गेल्या वर्षीच्या तुलनेत संपूर्ण देशातच या आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांत या रुग्णांची संख्या चिंताजनक असून तीव्र श्वसनविकारामुळे मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत चालल्याचे ‘राष्ट्रीय आरोग्य अहवाल २०१९’ नुसार दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीला प्रदूषणाने वेढून टाकले आहे. शेजारील राज्यांमध्ये शेतीसाठी गवत जाळण्यापासून ते वेगवेगळ्या कारणांनी दिल्लीचा श्वास घुसमटत आहे.

राष्ट्रीय नागरी अहवालाचा विचार करता संपूर्ण देशातच श्वसनविकाराचे रुग्ण तसेच श्वसनविकारामुळे मरण पावलेल्यांची संख्या २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. २०१७ मध्ये देशभरात चार कोटी २१ लाख ९९ हजार ६३३ तीव्र श्वसनविकाराच्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून या आजाराने ३२५४ लोकांचे मृत्यू झाले आहेत.

२०१८ साली देशभरात सव्वा लाख रुग्णांची वाढ झाली असून तीव्र श्वसनविकाराने मरण पावलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊन ३७४० लोकांचे मृत्यू झाले. एकटय़ा दिल्लीत दोन वर्षांपूर्वी तीव्र श्वसनविकाराच्या रुग्णांची संख्या दोन लाख ६१ हजार ९६३ एवढी होती, ती गेल्या वर्षी दुपटीने वाढून चार लाख २१ हजार ४७६ एवढी झाली. श्वसनविकाराच्या रुग्णांच्या मृत्यूतही ३५७ वरून ४९२ एवढी वाढ झाल्याचे राष्ट्रीय आरोग्य अहवालावरून स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेशातही तीव्र श्वसनविकाराचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून आले असून महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रणासह अनेक उपाययोजना काटेकोरपणे केल्या नाहीत तर आगामी काळात महाराष्ट्रातही तीव्र श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होईल, अशी भीती आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती : महाराष्ट्रातही दोन लाखांहून अधिक तीव्र श्वसनविकाराचे रुग्ण असून देशात सर्वाधिक श्वसनविकाराचे रुग्ण पश्चिम बंगालमध्ये आढळून आले आहेत. २०१७ मध्ये तीन लाख ९४ हजार रुग्णांची नोंद होती, तर ४५१ रुग्ण मरण पावले. २०१८ मध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन चार लाख ३७ हजार एवढे रुग्ण झाले तर ७३२ रुग्ण मरण पावल्याचे अहवालात नोंद आहे.