अक्षय मांडवकर

समुद्री घोडय़ांपासून शार्क माशांची चीन, जपानमध्ये बेकायदा विक्री

वाघ, बिबटय़ाची कातडी, हरणाची शिंगे अशा प्राण्यांच्या तस्करीच्या घटनांमुळे वेळोवेळी चर्चेत असलेला महाराष्ट्र विशेषत: राज्याचा किनारपट्टीचा भाग आता सागरी जीवांच्या तस्करीमुळे कलंकित होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांत समुद्री घोडे, शार्क, स्टारफिश, कासव यांच्या तस्करीची प्रकरणे उजेडात आल्यानंतर संरक्षित गणल्या जाणाऱ्या या सागरी जीवांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरमसाट मोबदल्याच्या हेतूने या जीवांची चीन, जपान या देशांत बेकायदा निर्यात केली जात आहे. मात्र याकडे लक्ष देणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने परिस्थिती गंभीर होण्याची भीती आहे.

गेल्या महिन्याभरात मुंबईतून सुमारे १०० किलो सुकविलेले समुद्री घोडे, शार्क माशांचे तब्बल आठ हजार किलो वजनाचे मत्स्यपर आणि स्टार प्रजातींच्या ५२३ कासवांची तस्करी उघडकीस आली आहे. केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण संस्थेने (डब्ल्यूसीसीबी) महसूल गुप्तचर संचालनालय आणि मुंबई हवाई सीमाशुल्क विभागाच्या मदतीने ही तस्करी उघडकीस आणली. आजवर चेन्नई आणि गुजरातमध्ये असणारे समुद्री जीवांच्या तस्करीचे केंद्र मुंबईत सरकत असल्याची भीती या निमित्ताने वर्तवण्यात येत आहे. ‘डब्ल्यूसीसीबी’ने २०१२ पासून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित असलेल्या गोडय़ा पाण्यातील तब्बल १,७३३ कासवांची तस्करी आतापर्यंत रोखली आहे. गेल्या महिन्यात बंगळूरु येथून मुंबई विमानतळावर आणण्यात आलेले समुद्री घोडे हवाई सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले. तर काही दिवसांपूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाने शिवडी आणि गुजरात येथून शार्क माशांचे तब्बल आठ हजार किलो पर ताब्यात घेतले. समुद्री घोडय़ांच्या काही प्रजाती संरक्षित असून सर्व प्रजातींच्या शार्क माशांच्या परांची तस्करी करणे गुन्हा आहे. तसेच शार्कच्या दहा प्रजाती संरक्षित असल्याने त्यांची मासेमारी करण्यावर बंदी आहे.

यासंबंधी ‘डब्लूसीसीबी’चे पश्चिम क्षेत्राचे प्रमुख एम. मारंको यांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्करांना संरक्षित समुद्री घोडय़ांचा हा साठा बंगळूरु येथून हाँगकाँग येथे पाठवायचा होता. मात्र मुंबईवाटे हा माल हाँगकाँगला जाणार असल्याची कल्पना तस्करांना नसल्याने ही तस्करी उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. बंगळूरु येथे ‘डब्लूसीसीबी’चे मनुष्यबळ कमी असल्याने त्या ठिकाणाहून मोठय़ा प्रमाणात समुद्री जीवांची तस्करी होत असल्याची माहिती मारंको यांनी दिली.

राज्याबाहेरचे तस्कर?

राज्यातील मच्छीमारांचा तस्करीमध्ये सहभाग नसून गुजरातमधून मोठय़ा संख्येने शार्कपर मुंबईत येत असल्याचे पर्ससीन मच्छीमार वेल्फेअर संघटनेचे उपाध्यक्ष गणेश नाखवा यांनी सांगितले. तर मत्स्यविभागाचे आयुक्त अरुण विधणे यांनीही याला दुजोरा दिला. दुसरीकडे, मुंबईत अजूनही शार्कपर, संरक्षित समुद्री प्रवाळ-शैवाळ, शंख-शिंपल्यांची तस्करी सुरू असून यासंबंधीचे पुरावे लवकरच वनविभागसह ‘डब्लूसीसीबी’ आणि मत्सव्यवसाय विभागाकडे सादर करणार असल्याचा दावा वन्यजीवरक्षक सुनिष कुंजू यांनी केला.

तस्करीची कारणे

* सुकविलेल्या समुद्री घोडय़ांचे सूप प्यायल्याने लैंगिक शक्ती वाढते अशी धारणा सिंगापूर, चीन, जपान या देशांमध्ये असल्याने भारतातून त्यांची तस्करी होत असल्याची माहिती वन्यजीव तस्करीचे अभ्यासक विजय अवसरे यांनी दिली.

* शार्क माशांच्या विविध अवयवांची तस्करी ही परदेशात सूप, सौंदर्य प्रसाधने, तेल, कपडे बनविण्यासाठी होते, तर घरामध्ये समुद्री प्रवाळ लावल्याने कुटुंबाची प्रगती होते, अशा अंधश्रद्धेपोटी सागरी जीवांसह, वनस्पतींची तस्करी होत असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील समुद्री जीवांच्या तस्करीबाबत जनजागृतीकरिता वनविभाग आणि महसूल गुप्तचर संचालनायाच्या अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे. मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकाऱ्यांसोबत पुढील आठवडय़ात बैठकीचे नियोजन असून त्यांना संरक्षित सागरी जीव आणि त्यांच्या तस्करीबाबत माहिती दिली जाणार आहे.

– एम. मारंको, पश्चिम परिक्षेत्र प्रमुख, डब्लूसीसीबी