सुहास जोशी

एकाच कंपनीचे शंभरेक उच्चाधिकारी, दोन-तीन दिवस बैठका, प्रदर्शन, परिषदा, प्रोत्साहनपर बक्षिस आणि करमणूक असे सर्व कार्यक्रम एकाच ठिकाणी असणाऱ्या ‘माईस’साठी कॉर्पोरेट जगताचा क्रूझवर जाण्याकडे कल वाढला आहे. काही क्रूझ कंपन्यांच्या एकूण पर्यटनातील माईसचा वाटा सुमारे ४० टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे.

अथांग समुद्रात भल्या मोठय़ा क्रूझवर माईसच्या आयोजनाचे प्रमाण वाढले असून भारतातील व्यवसायाचा ४० टक्के वाटा हा ‘माईस’चा असल्याचे कोस्टा क्रूझच्या भारतीय प्रमुख नलिनी गुप्ता यांनी सांगितले. तर २०१९ मध्ये सुरु झालेल्या जलेश क्रूझ कंपनीने गेल्या वर्षभरात सुमारे ५० माईस टूरचे आयोजन केल्याचे जलेशचे राजीव दुग्गल यांनी नमूद केले.

क्रूझवरील माईससाठी बँकिंग, विमा, सिमेंट, औषध उत्पादन कंपन्या, एफएमसीजी या क्षेत्रातील कंपन्यांचा ओढा असल्याचे क्रूझ कंपन्यांकडून सांगण्यात आले. साधारणपणे दोन ते तीन दिवसाच्या क्रूझ पर्यटनात माईसचा समावेश केला जात आहे.

एकाच छताखाली सर्व सुविधा असल्यामुळे आणि एकाच ठिकाणी समूहाला हाताळणे सोपे असल्यामुळे क्रूझला प्राधान्य मिळत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. त्याचबरोबर एखाद्या पर्यटनस्थळावरील माईसच्या ऐवजी समुद्रावरील भटकंती सोयीस्कर असल्याचा कॉर्पोरट जगताचा अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी व्हिसा वगैरे सुविधादेखील क्रूझच्या माध्यमातून मिळत असल्यामुळे कॉर्पोरेट जगतातून सकारात्मक प्रतिसाद मिळतो असे दुग्गल यांनी स्पष्ट केले. तसेच समूहाने नोंदणी केल्यामुळे समूह नोंदणी सवलतीचा फायदादेखील यामध्ये मिळतो असे त्यांनी सांगितले.

माईस म्हणजे काय? : कॉर्पोरेट क्षेत्रातील ताणतणावापासून दूर जात एकाच वेळी काम आणि करमणूक असा दुहेरी हेतू साध्य करण्याच्या उद्देशाने माईस ही संकल्पना गेल्या काही वर्षांत वाढीस लागली. पर्यटनाबरोबरच ‘माईस’ (मिटींग्ज-इन्सेन्टीव्ह-कॉन्फरन्स-इव्हेन्ट/एक्झिबिशन – टकउए) हा प्रकार कॉर्पोरेट जगतात रुळला. सुरुवातीच्या काळात परदेशातील एखाद्या पर्यटनस्थळी जाण्यास प्राधान्य होते. त्यातही आग्नेय अशियातील देशांकडे अधिक कल असायचा. पण भारतातील क्रूझ पर्यटन सुविधांमध्ये वाढ होऊ लागली तशी माईससाठी क्रूझला पसंती मिळू लागली.

‘माईस’चे लोकप्रिय मार्ग

* भारत-सिंगापूर-दुबई

* मुंबई-कोचिन-मालदिव

* गोवा-दिव-गणपतीपुळे

* भूमध्यसागरीय प्रदेश, उत्तर युरोप आणि जपान

सर्वसाधारण खर्च

सर्वसाधारणपणे १०० जणांच्या समूहास तीन दिवसांसाठी सुमारे ३० हजार ते ५० हजार रुपये प्रति माणशी