ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने २५५ धावांपर्यंत मजल मारली. शिखर धवन आणि लोकेश राहुल या फलंदाजांचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरला.

या सामन्यादरम्यान मैदानावर एक अनोखा प्रकार दिसून आला. देशभरात CAA आणि NRC वरुन सुरु असलेल्या निदर्शनांची झळ या सामन्यालाही बसलेली पहायला मिळाली. मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी आपल्या टी-शर्टवर NO CAA – NO NRC असं लिहून केंद्र सरकारच्या कायद्याला विरोध दर्शवला. सोशल मीडियावर मुंबईतल्या या तरुणांचा निषेध नोंदवण्याचा प्रकार चांगलाच व्हायरल झाला आहे.

मैदानात या तरुणांनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं

 

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना, भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या १० धावा काढून माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान शिखर धवनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. लोकेश राहुल अर्धशतकापासून अवघ्या ३ धावा दूर असताना बाद झाला आणि भारताची जोडी फुटली. यानंतर भारतीय फलंदाजांनी निराशाजनक खेळी केली.

शिखर धवन ७४ धावांची खेळी करुन माघारी परतल्यानंतर एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. सर्व फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिल्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये भारत धावसंख्या वाढवू शकला नाही. तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २५५ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ३, पॅट कमिन्सने २ तर झॅम्पा-आगर आणि रिचर्डसन या त्रिकुटाने १-१ बळी घेतला.