करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी साजऱ्या होणाऱ्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी कोविड योद्धय़ांचा सन्मान केला जाणार आहे. यंदा विविध ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी प्रथमच सफाई कामगार, डॉक्टर, आरोग्य सेवक यांच्यासह करोनावर मात केलेल्या नागरिकांनाही निमंत्रित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण कार्यक्रम अंतराचे सर्व नियम पाळून साजरा होणार आहे. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्वाना मुखपट्टय़ा बंधनकारक आहेत. राज्याचा मुख्य कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयाच्या प्रांगणात होणार असून विभागीय आयुक्त तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीही पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या वेळी सर्व ठिकाणी एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहेत. या वेळी  करोना रोखण्याच्या लढय़ात आपले योगदान देणारे सफाई कामगार, डॉक्टर, आरोग्यसेवक तसेच करोनावर मात केलेले नागरिक अशा करोना योद्धय़ांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले असून स्वातंत्र्यदिनी संबंधित गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी एका गावात ध्वजारोहण करावे, इतर गावात स्वातंत्र्यसैनिक किंवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष किंवा ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांनी नेमलेले सक्षम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना दिले आहेत. ज्या गावांमध्ये सरपंच कार्यरत आहेत तिथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.