संदीप आचार्य

दिवसागणिक करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे आणि प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांची अन्यत्र व्यवस्था करण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने घेतला आहे.

नायर रुग्णालयाच्या आवारात, तसेच वांद्रे कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’ कार्यालय, गोरेगाव, वरळी आदी ठिकाणी अशा रुग्णांची व्यवस्था केली जाणार आहे.

एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच करोनाची लागण झालेल्या अनेक रुग्णांचे लक्षणरहित होण्याचे प्रमाण १४ दिवसांवरून आठ ते दहा दिवसांपर्यंत आल्याचे पालिका आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईत जरी करोनाचे प्रमाण वाढत असले तरी त्यातील ८० टक्के लोक हे कोणतीही लक्षणे नसलेले असल्याचे आढळून येत आहे. विशेष म्हणजे अनेक रुग्णांची आठव्या ते दहाव्या दिवशी केलेली चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर सौम्य लक्षणे आणि प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांची अन्यत्र व्यवस्था करून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

रुग्णालयात उपचारानंतर कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांची पुढील काही दिवस निरीक्षणाखाली अन्यत्र व्यवस्था करण्याची शिफारस मुंबईसाठी नियुक्त केलेल्या डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली होती. त्यामुळे सध्या पालिका रुग्णालयांवर येणारा ताण कमी होऊन नवीन रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध होतील.

कुठे कशी सुविधा? : करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी जवळपास सात हजार खाटा निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात पालिका रुग्णालयात साडेतीन हजार खाटांची ऑक्सिजनसह व्यवस्था असेल, तर खासगी रुग्णालयात साडेतीन हजार खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. नायर रुग्णालयात ८०० खाटा येत्या आठवडाभरात तयार होतील. त्याचबरोबर  उपचारानंतर लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांसाठी नायरच्याच आवारात २७५ खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. या रुग्णांवर पुढील काही दिवस डॉक्टरांकडून बारीक लक्ष ठेवले जाईल व पूर्ण बरे झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात येईल. अशाच प्रकारे वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर तीन हजार, गोरेगाव एनएससी मैदान येथे एक हजार, लक्ष्मी इंडस्ट्रीज येथे ३००, तर वरळी येथे लक्षणे नसलेल्या ५०० रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे डॉ. संजय ओक यांनी सांगितले.