‘लोकसत्ता’मधील लेखाची दखल

विविध नाटय़गृहातील नाटकांच्या तारखांचे वाटप करण्यासाठी मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघातर्फे एका स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत सात सदस्य असून निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी रविवारी समितीची स्थापना केली.

मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघातील वाद, हेवेदावे, तारखा वाटपात अडकलेला निर्माता संघ, निर्माते व नाटय़व्यवसायापुढील आव्हाने याचा ऊहापोह ‘लोकसत्ता रविवार वृत्तान्त’ (२० नोव्हेंबर २०१६) मधील ‘वाद निर्माता संघ’या लेखात करण्यात आला होता. निर्माता संघाकडून त्याची तातडीने दखल घेण्यात येऊन तारखा वाटपासाठी या स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या समितीत ज्येष्ठ निर्मात्या लता नार्वेकर, ज्येष्ठ निर्माते अनंत पणशीकर यांच्यासह उदय धुरत, जनार्दन लवंगारे, देवेंद्र पेम, शेखर दाते, श्रीकांत तटकरे यांचा समावेश आहे.

तारखा वाटप हा सर्व निर्मात्यांसमोरील महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या तारखांचे तिमाही वाटप योग्यदृष्टय़ा कसे करता येईल यासाठी ही समिती काम करणार आहे. तारखा वाटपाच्या वेळी निर्माता संघाच्यावतीने ही समिती सर्व नाटय़गृहांवर हजर राहणार आहे.

‘तारखा वाटप’ या विषयाबाबत निर्माता संघाची ही समिती काम करणार आहे. समितीच्या कामाचा चांगला आणि दृश्य परिणाम काही महिन्यांतच दिसून येईल. तारखा वाटप व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक कसा राहील, त्यावर आमचा भर असेल.  –  प्रसाद कांबळी, अध्यक्ष व्यावसायिक नाटय़ निर्माता संघ