अस्थिव्यंग उपचार विभागात दररोज ४० शस्त्रक्रिया

मोटार अपघातात राजेशच्या पायाच्या हाडांचा चक्काचूर झाला होता. आपण या आयुष्यात आता आपल्या पायावर पुन्हा उभे राहू शकणार नाही, असे त्याला वाटत होते. महापालिकेच्या केईएम रुग्णालयात जेव्हा त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा आपली निराशा त्याला लपवता येत नव्हती. तर उपचार करणारे डॉक्टर धीर देण्याचे काम करत होते. आपले सारे कौशल्य पणाला लावून डॉक्टरांनी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केल्या. आज राजेश पुन्हा आपल्या पायावर उभा आहे. गेल्या ७५ वर्षांमध्ये अशा असंख्य जटिल शस्त्रक्रिया केईमच्या अस्थिव्यंग उपचार विभागात केल्या जातात. १७ फेब्रुवारी रोजी या विभागाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला असून यानिमित्ताने ‘क्रीडा अस्थिव्यंग उपचाराचा स्वतंत्र कक्ष’ लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

अस्थिव्यंगशास्त्र विषयात केईएम रुग्णालय हे राज्यात सर्वप्रथम असून देशात पहिल्या पाच क्रमांकाची संस्था म्हणून ओळखली जाते. गेल्या सात दशकांमध्ये एकापेक्षा एक दिग्गज डॉक्टर येथे घडले व आपल्या कामातून केईएमची पताका जगात फडकवत ठेवली. १९४२ साली डॉ. आ. जे. कात्रक यांनी अस्थिव्यंग शास्त्र विभागाची स्थापना केली तेव्हा विभागात अवघ्या तीस खाटा होता. आज अपघातापासून मणक्यांच्या शस्त्रक्रियेपर्यंत अस्थिव्यंगाचे असे कोणतेही अंग नसेल ज्यावर येथे उपचार होत नाहीत.

अस्थिव्यंगाच्या अनेक जटिल शस्त्रक्रिया येथे दररोज केल्या जात असून रुग्णांच्या येणाऱ्या लोंढय़ांमुळे सध्या असलेल्या ४८० खाटाही अपुऱ्या पडत असल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. अस्थिव्यंग शास्त्र विभागात दररोज सुमारे चारशे रुग्णांची बाह्य़ रुग्ण विभागात तपासणी केली जाते, तर दररोज ४० शस्त्रक्रिया रुग्णालयात करण्यात येत असून यातील २५ शस्त्रक्रिया या कमालीच्या जटिल असल्याचेही डॉ. सुपे यांनी सांगितले.

कक्ष स्थापणारी देशातील पहिली वैद्यकीय संस्था

विभागप्रमुख डॉ. सुधीर श्रीवास्त, डॉ. मोहन देसाई, डॉ. एस. वैद्य यांच्यासह सहा प्राध्यापक व एकूण वीस अध्यापकांच्या माध्यमातून सांधेबदल, मणक्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बीण शस्त्रक्रिया अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. शनिवारी झालेल्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला भाभा अणुशक्ती केंद्राचे अणुतज्ज्ञ डॉ. चिदम्बरम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर पद्मभूषण डॉ. संचेती, पद्मभूषण डॉ. वाड, डॉ. चौबळ, डॉ. लाहेरी, डॉ. व्होरा आदी ज्येष्ठ अस्थिव्यंगतज्ज्ञ आवर्जून उपस्थित राहिले. क्षयरोग रुग्णांवर अस्थिव्यंगाच्या शस्त्रक्रिया करणे हे मोठे आव्हान असून येथील माजी डॉक्टर भोसले यांचे मोठे काम आहे. केईएमच्या या विभागातील डॉक्टरांचे अनेक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून लवकरच क्रिकेट, कबड्डीसह वेगवेगळ्या खेळांत खेळाडूंना होणाऱ्या हाडांच्या प्रश्नांसंदर्भात संशोधन व उपचार करण्यासाठी स्वतंत्र ‘क्रीडा अस्थिव्यंग संशोधन कक्ष’ स्थापन करण्यात येणार असल्याचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. अशा प्रकारचा कक्ष सुरू करणारी केईएम ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील पहिली वैद्यकीय संस्था असेल.