मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’साठी स्वतंत्र पथक

महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून, या राज्याने नेहमीच तरुणांना मार्ग दाखविला आहे. युवकांमधील शौर्य, ज्ञान, भक्ती-शक्तीच्या जोरावर नवमहाराष्ट्र घडविताना महाराष्ट्रातील युवाशक्तीच्या संकल्पनांना नवे बळ देऊन त्या विकासात परावर्तित करण्याचे काम राज्य शासन करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली. दरम्यान, ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात येणार असून, महाराष्ट्राचा संपूर्णपणे विकास होईपर्यंत हा कार्यक्रम सुरूच राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वरळी येथील एनएससीआय येथे आयोजित ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी युवकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कॅप्टन अमोल यादव यांनी स्वदेशी बनावटीचे व्यावसायिक एअरक्राफ्ट बनविले आहे. माणसाच्या मनात काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असली की त्या माणसाला त्याचा मार्ग सापडतोच, हे कॅ. यादव यांच्या जिद्दीवरून लक्षात येते. यादव यांच्या निर्मितीस व्यावसायिक परवानगी मिळावी अशी विनंती आपण पंतप्रधानांना केली असून ही परवानगी मिळाली तर भारतीय बनावटीचे विमान आकाशात उडताना दिसेल आणि याचे श्रेय नक्कीच अमोल यादव यांना असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’च्या निमित्ताने बदलाची आवश्यकता आणि बदलासाठी युवाशक्तीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे सहा लाख युवकांनी सहभाग नोंदविला. २३०० हून अधिक सादरीकरणे प्राप्त झाली. त्यातील निवडक ११ सादरीकरणे याठिकाणी करण्यात आली. आज गौरविण्यात आलेली ही सादरीकरणे नवा महाराष्ट्र घडविण्यात निश्चितच योगदान देईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राकडे मोठय़ा अपेक्षेने पाहिले जात आहे. आज भारताची ६५ टक्के लोकसंख्या सरासरी ३५ वर्षे वयोगटातील आहे, तर ५० टक्के लोकसंख्या ही सरासरी २५ वर्षे आहे. आज भारताकडे युवा देश म्हणून पाहिले जाते. ही सगळी ताकद मानवसंसाधनात परावर्तित झाली तर भारत विकसित देश म्हणून ओळखला जाईल. इतर देशांच्या तुलनेत भारतातील लोकसंख्येचे सरासरी वय पाहता युवाशक्ती ही भारताची ताकद आहे, या आजच्या युवाशक्तीला तंत्रज्ञानाचाही भक्कम आधार आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान आणि युवाशक्ती यांचा मेळ घालून भारतातील समाजाला प्रगत करण्याचा प्रयत्न राहील. तंत्रज्ञानामुळे १५ वर्षांची प्रगती दोन वर्षांत होणे शक्य आहे. या तरुणाईची इच्छाशक्ती आणि तंत्रज्ञानामुळे देशाच्या विकासात योगदान असणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

 

या वेळी तंत्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून आलेल्या एकूण २ हजार ३०० सादरीकरण प्रवेशिकांपकी सवरेत्कृष्ट ११ प्रकल्पांचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले. यापैकी काही प्रकल्प ..

टाटा समाजविज्ञान संस्था

‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावरील प्रकल्प. अविघटनशील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने सामान्य नागरिकांसाठी जागोजागी केंद्रे उभारून नागरिकांना कचऱ्याची काही किंमत द्यावी. यामुळे अविघटनशील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत होईल. नागरिकांना ‘एटीम कार्ड’सारखे एखादे कार्ड उपलब्ध करून त्यामध्ये मोबदला जमा केल्यास सरकारच्या रोकडविरहित उपक्रमालाही यश मिळू शकेल.

वसंतदादा पाटील महाविद्यालय-‘भूमिपुत्र’ गट

‘शहरी भागातील गरिबांचे सक्षमीकरण’ या विषयावर सादरीकरण. सतत स्थलांतर करणाऱ्या कामगारांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी एकाच ठिकाणी या मुलांना शिक्षण, क्रीडा, कला आदींचे शिक्षण कसे मिळेल त्याची माहिती.

द्वारकानाथ संघवी महाविद्यालय-उत्कर्ष गट

‘ग्रामीण भागातील गावांचे डिजिटायजेशन’ या विषयावर सादरीकरण. ग्रामीण भागात अशा डिजिटल तंत्रज्ञासाठी पसे खर्च करणे शक्य नसल्याने काही खाजगी संस्था अथवा कंपनी यांनी एखादे गाव डिजिटल पद्धतीने दत्तक घ्यावे.

‘आयआयटी’-मुंबई

‘जय किसान’ या विषयावर ‘दुष्काळ व्यवस्थापन समाधान’ याविषयी सादरीकरण. सरकार आणि अनेक सामाजिक संस्था दुष्काळग्रस्त भागातील पाणलोट व्यवस्थापनावर काम करत आहेत. सध्या चालू असलेल्या पाणलोट व्यवस्थापनामध्ये काही उपाययोजना सुचविण्यावर या सादरीकरणाचा भर होता. ‘ड्रोन’ कॅमेऱ्याच्या मदतीने मातीची गुणवत्ता, जमिनीची धूप याची चाचणी करता येऊ शकेल.