सुशांत मोरे

परिवहन विभागाची योजना; पालिकांच्या मदतीने उभारणी

रस्त्याच्या कडेला किंवा चौकात कोठेही उभे राहून शाळेच्या बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि वाढत्या शालेय बसमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन अशा बससाठी स्वतंत्र बसथांबे उभारण्याची योजना परिवहन विभागाने आखली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने हे थांबे उभारले जाणार असून त्यासाठी परिवहन विभागाला १५ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई अशा मोठय़ा शहरांबरोबरच अनेक लहानमोठय़ा गावांमध्येही बसगाडय़ांच्या माध्यमातून मुले शाळेत येजा करतात. त्यामुळे बसगाडय़ांची संख्या वाढतेच आहे. राज्यात २९ हजारपेक्षा जास्त शालेय बसगाडय़ा असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यात त्या सर्वाधिक आहेत. २०१५ पासून शाळा बस गाडय़ांची संख्या वाढतच आहे. गेल्या पाच वर्षांतच ११ हजार शाळा बसगाडय़ांची भर राज्यात पडली आहे. प्रत्येक वर्षी अडीच ते चार हजार नवीन शाळा बसगाडय़ांची नोंदणी होत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या प्रश्नात भर पडली आहे.राज्यात सध्या शाळा बससाठी थांबे नाहीत. त्यामुळे बसची वाट पाहात उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो.

ही परिस्थिती पाहता परिवहन विभागाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी पालिकांच्या मदतीने शाळा बस थांबे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक आरटीओंना थांब्याची  गरज तपासून पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील सदस्य स्वतंत्रपणे थांब्याकरिता आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतील आणि त्यानुसार अधिसूचना काढली जाईल. यासाठी पालिकांशी पत्रव्यवहारही केला जाणार आहे, असे  परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सांगितले.

शाळा बसची वाढती संख्या

वर्ष           शाळा बस

२०१४             २३,६५०

२०१५             १८,३८७

२०१६             २२,३२२

२०१७         २४,१६७

२०१८        २६,७०४

२०१९         २९,४०५

काय होणार?

शाळा बसगाडय़ांसाठी थांबा उभारल्यास त्या ठिकाणाहून जाणाऱ्या अन्य वाहनांकडूनही सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. थांबा उभारताना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नेमक्या कोणत्या सुविधा असाव्यात याचीही माहिती घेण्यात येणार आहे.

सध्या राज्यात शाळांच्या बसगाडय़ांकरिता थांबे नाहीत. विद्यार्थ्यांसाठी बस स्टॅण्ड उभारण्याचा निर्णय चांगला आहे. परिवहन विभागाला जे सहकार्य हवे असेल ते आम्ही करू.

– अनिल गर्ग, अध्यक्ष, शाळा बस ओनर्स असोसिएशन