सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्यानंतर सायबरविश्वात तसेच हैदराबाद येथील त्यांच्या शाळेत आनंदाला प्रचंड उधाण आले. गुगल सर्च बॉक्सवरही नाडेला यांचे नाव टाकले असता अवघ्या अध्र्या सेकंदात सुमारे ४४ कोटी निकाल उपलब्ध होत होते. त्यामुळे इंटरनेटसह सर्वत्र ‘सत्या’जल्लोषाचेच वातावरण होते.
अवघ्या ४६ वर्षीय आणि जन्माने भारतीय असलेल्या सत्या नाडेला यांच्या निवडीचे प्रतिबिंब इंटरनेटवर उमटले आहे. गुगल न्यूजवर सत्या नाडेला यांचे नाव शोधले असता, सुमारे १ कोटी २८ लाख वृत्तलेख पाहावयास मिळत आहेत. तर गुगलच्या सर्च बॉक्सवर ‘सत्या नाडेला’ अशी पृच्छा केली असता अवघ्या अध्र्या सेकंदात ४४ कोटी निकाल उपलब्ध होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा (६५ कोटी सर्च रिझल्ट्स) आणि बिल गेट्स (४८ कोटी सर्च रिझल्ट्स) यांच्यानंतर नाडेला यांचा तिसरा क्रम लागतो.
शाळेतही आंनदास उधाण
हैदराबाद येथील बेगमपेठमध्ये असलेल्या हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये नाडेलांचे शिक्षण झाले. त्या शाळेचे मुख्याध्यापक कर्नल आर.एस. खत्री यांनी नाडेला यांचे अभिनंदन केले. २०११मध्ये शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात, ‘नाडेला हे नाव गुगलवर टाकले असता अवघ्या ०.१३ सेकंदात १ लाख १४ हजार निकाल मिळत असल्याचे नाडेला यांच्या उपस्थितीत मी नमूद केले होते’, अशी आठवण खत्री यांनी सांगितली. त्यावेळी नाडेला यांनी मिश्किलपणे ‘मायक्रोसॉफ्ट’च्या कर्मचाऱ्यांना या संख्येवर योग्य ते ‘नियंत्रण’ ठेवण्यास सांगू असे नमूद केल्याचेही खत्री यांनी सांगितले.
जल्लोषात स्वागत
नव्या जबाबदारीची सूत्रे हाती घेणाऱ्या नाडेला यांचे त्यांच्या कार्यालयातही मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. एका छोटय़ा व्यासपीठाभोवती गोळा होत मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांनी मान झुकवून त्यांना मानवंदना दिली, तसेच त्यांच्या नावाचा टाळ्यांच्या गजरात उद्घोष केला.

‘सोशल साइट्स’वरही हिट
मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे सत्या नाडेला स्वीकारणार अशी घोषणा होताच इंटरनेटवर त्यांच्या नावाचे सर्च वाढू लागले. मायक्रोसॉफ्टनेही यासंदर्भातील काही अधिकृत व्हिडीओही ‘यू टय़ूब’वर अपलोड केले. यामुळे सोशल साइट्स, यू टय़ूब, गुगल सर्च इंजिन अशा विविध ठिकाणी सत्या नाडेला यांचेच नाव दिसू लागले. नाडेला यांच्यावर बिल गेट्स यांनी व्हिडीओ तयार केला होता. या चित्रफितीस एक लाख ५० हजार ८४ प्रेक्षक तर त्यांच्या मुलाखतीच्या चित्रफितीस दोन लाख ४१ हजार ३५९ प्रेक्षक लाभले. नाडेला यांचे सर्वाधिक सर्च हे भारतातून झाले. नाडेला यांच्या नावाने फेसबुक पेज उघडताच त्याला ३० हजार ‘लाइक्स’ मिळाले तसेच शुभेच्छांचा वर्षांवही झाला.