चीन पहिल्या, तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर

रसिका मुळ्ये, लोकसत्ता

मुंबई : देशातील संशोधनाच्या दर्जाबाबत सातत्याने चर्चा होत असली, तरी संख्यात्मक पातळीवर भारताने जगात तिसरे स्थान मिळवले आहे. विज्ञान-तंत्रज्ञान विषयातील शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून २०१८ मध्ये भारतीय संशोधकांचे साधारण १ लाख ३५ हजार शोधनिबंध आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले. चीन पहिल्या स्थानावर तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे.

अमेरिकेतील ‘नॅशनल सायन्स फाऊंडेशन’ने प्रसिद्ध केलेल्या आढावा अहवालातून ही बाब समोर आली आहे. जगातील एकूण शोधनिबंधांपैकी ५.३१ टक्के शोधनिबंध भारतातील आहेत. २००८ ते २०१८ या दहा वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांची संख्या दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. २००८ मध्ये भारतीय संशोधकांचे ४८ हजार ९९८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते. २०१८ मध्ये ही संख्या १ लाख ३५ हजार ७८८ पर्यंत पोहोचली. अभियांत्रिकी विषयातील शोधनिबंध प्रसिद्ध करण्याकडे भारतीय संशोधकांचा सर्वाधिक कल असून त्याचे प्रमाण ०२३ टक्के आहे. त्याखालोखाल संगणक शास्त्र विषयांतील संशोधन भारतात झाले असून त्याचे प्रमाण १८ टक्के आहे. संगणक शास्त्रातील सर्वाधिक शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात भारत आघाडीवर आहे.

चीनच्या संशोधकांचे दहा वर्षांत सर्वाधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून २०१८ मध्ये ५ लाख २८ हजार २६३ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. जगातील एकूण शोधनिबंधांपैकी २०.६७ टक्के वाटा चीनचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून ४ लाख २२ हजार ८०८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. एकूण संशोधनात अमेरिकेचा वाटा १६.५४ टक्के आहे. याशिवाय जर्मनी, जपान, इंग्लंड, रशिया, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स हे देश पहिल्या दहामध्ये आहेत.

गुणवत्तेबाबत प्रश्न कायम

अमेरिकेच्या सायन्स फाऊंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील संशोधनाने संख्यात्मक पातळीवर झेप घेतली असली तरी गुणवत्तेबाबतचे प्रश्न कायम आहेत. भारतीय शोधनिबंधांमध्ये वाङ्मयचौर्याचे प्रमाण अधिक असल्याचा आक्षेप अनेक संस्थांकडून वारंवार घेण्यात येत आहे. याबाबत देशातील संशोधनचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीनेही काही महिन्यांपूर्वी शोधनिबंधांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

शोधनिबंधांची टक्केवारी

अभियांत्रिकी     २३.३०

संगणकशास्त्र    १४.६८

जीवशास्त्र       १४.१६

वैद्यकशास्त्र     १३.६५

रसायनशास्त्र    ९.८३

भौतिकशास्त्र     ८.१२