अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचं बिंग फोडल्याचा दावा गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर समोर आलेल्या एफआयआरमध्ये मात्र रिपब्लिक या वाहिनीऐवजी इंडिया टुडेचं नाव असल्याचं दिसलं होतं. त्यानंतर या घोटाळ्यात या दोन्ही वाहिन्यांपैकी कोणाचं नाव आहे असा सवाल विचारला जात होता. दरम्यान, यावर मुंबई पोलीस सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “एफआयआरमध्ये इंडिया टुडेचं नाव होतं. परंतु आरोपी किंवा कोणत्याही साक्षीदारानं याची पुष्टी केली नाही,” असं भारांबे म्हणाले.

“एफआयआरमध्ये इंडिया टुडेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु कोणत्याही आरोपीनं अथवा साक्षीदारानं याची पुष्टी केली नाही. याव्यतिरिक्त आरोपींनी विशेषत: रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्यांची नावं घेतली. या प्रकरणी तपास सुरू आहे,” असं भारांबे म्हणाले. तर दुसरीकडे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी रिपब्लिक टीव्हीचं नाव घेतल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली होती. “सुशांतसिंह राजपूतप्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या संशयास्पद तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केल्याने पोलीस आयुक्त परमबीर सिंग रिपब्लिक वाहिनीविरोधात बिनबुडाचे आरोप करत आहेत. बीएआरसीने एकाही तक्रारीत रिपब्लिक वाहिनीचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आयुक्त सिंग यांचेच पितळ उघडे पडले. या कृतीबद्दल रिपब्लिक टीव्ही वाहिनी सिंग यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेल.” असं अर्णब गोस्वामी म्हणाले.

आणखी वाचा- समजून घ्या : TRP म्हणजे काय आणि तो कसा मोजतात?

काय आहे विषय?

गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने या घोटाळ्याप्रकरणी फक्त मराठीचे मालक शिरीष पट्टनशेट्टी, बॉक्स सिनेमाचे मालक नारायण शर्मा यांच्यासह हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा माजी रिलेशनशीप मॅनेजर विशाल वेद भंडारी आणि बोम्पाली मेस्त्री यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास उपायुक्त नंदकुमार ठाकूर, अकबर पठाण यांच्या देखरेखीखाली सहायक आयुक्त शशांक सांडभोर, गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी निरीक्षक सचिन वाझे आणि पथकाकडून सुरू आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या आधिपत्याखालील भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल (बीएआरसी) वाहिन्यांच्या लोकप्रियतेबाबत संशोधन करते आणि त्याआधारे गुण किंवा टीआरपी निश्चित करते. या मोजमापासाठी बीएआरसीने देशभरात सुमारे तीन हजार बॅरोमिटर बसविले आहेत. बॅरोमिटरद्वारे दिवसाच्या कोणत्या कालावधीत सर्वाधिक टीव्ही पाहिला जातो, कोणती वाहिनी जास्त पाहिली जाते, कोणता कार्यक्र म सर्वाधिक पाहिला जातो याबाबतची निरीक्षणे नोंदवली जातात.

आणखी वाचा- मुंबई पोलिसांकडून TRP रॅकेटचा पर्दाफाश; पोलीस आयुक्तांनी दिली धक्कादायक माहिती

टीआरपी नोंदविणाऱ्या हंसा रिसर्च ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना विश्वासात घेऊन खोट्या नोंदी तयार करून हा गैरप्रकार केला. या घोटाळ्याचा सुगावा हंसा रिसर्च ग्रुपला जून महिन्यात लागला. त्यानंतर ग्रुपने यातील आरोपी भंडारी याला कामावरून कमी केले होते. हंसा ग्रुपने केलेल्या तक्रोरीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. अटक आरोपी भंडारी, मेस्त्री यांच्या चौकशीतून रिपब्लिकसह अन्य वाहिन्यांचा टीआरपी कृत्रिमरीत्या वाढविण्यात आल्याची माहिती पुढे आल्याचा दावा पोलीस आयुक्त सिंग यांनी केला. लोकसत्ताला मिळालेल्या माहितीनुसार विशेष पथकानं रिपब्लिक वृत्त वाहिनीच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे. या घोटाळ्यात कंपनीच्या मालकापासून तळाच्या अधिकाऱ्यापर्यंत ज्या कोणाचा सहभाग आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे सिंग यांनी सांगितलं.

घोटाळा कसा?

बीएआरसीने केबल किंवा डिशद्वारे वाहिन्यांचे प्रक्षेपण विकत घेणाऱ्या तीन हजार ग्राहकांच्या घरी टीआरपी मोजण्यासाठी गुप्तपणे यंत्रणा बसवली. बीएआरसीने या कामासाठी हंसा रिसर्च ग्रुपची निवड केली. त्यातील अधिकाऱ्यांनी यांतील दोन हजार ग्राहकांना विश्वासात घेतले. महिन्याकाठी किरकोळ रक्कम देण्याच्या आमिषावर ग्राहकांना दिवसभर किंवा दिवसातील काही ठरावीक तास ठरावीक वाहिन्या सुरू ठेवण्यासाठी तयार केले. या कृतीमुळे मिळालेल्या नोंदींआधारे अपेक्षित असलेल्या ठरावीक वाहिन्यांचे टीआरपी वाढवण्यात आले.