निमित्त : सापेक्षतावादाची शताब्दी; गुरुत्वीय तरंगांचा शोध सुरूच
हा सिद्धांत मांडला गेला नसता तर कदाचित आपल्या मोबाइल फोनमधील जीपीएस यंत्रणेचा शोध लागला नसता, आपल्याला पृथ्वीच्या जन्माची रहस्ये उलगडली नसती, की ‘स्टार वॉर्स’सारख्या चित्रपट मालिकेतील आकाशगंगा प्रवासाची कल्पनाही करता आली नसती.. अशा या विश्वाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनच बदलणाऱ्या ‘व्यापक सापेक्षतावादा’च्या सिद्धांताला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. नोबेलविजेते विश्वविख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आइन्सटाइन यांनी २५ नोव्हेंबर १९१५ रोजी मांडलेल्या या महत्त्वपूर्ण सिद्धांताची शताब्दी जगभरातील विज्ञानविश्व मोठय़ा उत्साहात साजरी करीत असताना भारतही त्यात मागे नसल्याची, एवढेच नव्हे तर त्या सिद्धांताने ज्या गुरुत्वीय तरंगांचे अस्तित्व मांडले होते, त्यांचा शोध घेण्यासाठी भारताने कंबर कसल्याची बातमी हाती आली आहे.
‘गुरुत्वीय तरंगां’चे अस्तित्व शोधण्यासाठी जगभरात विविध ठिकाणी परिक्षण केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यांस ‘लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल- वेव्ह ऑब्झर्वेटरी’ (लायगो) असे म्हणतात. असेच परीक्षण केंद्र लवकरच भारतात उभारले जाणार आहे.
आपणांस विश्व दिसते ते फक्त पाच टक्केच. बाकीचा ९५ टक्के भाग आपल्या दृष्टीस पडूच शकत नाही. तेथील प्रकाशकणांशी आपण संपर्क प्रस्थापित करू शकत नाही. मात्र तेथील गुरुत्वीय लहरी मात्र संपर्क साधतात, असे आइन्सटाइनच्या सिद्धांतात नमूद आहे. मात्र त्या लहरी अद्याप आपणांस दिसू शकलेल्या नाहीत. ‘लायगो’ या निरीक्षण केंद्रातून त्यांचा बोध होणे शक्य होणार आहे. तो झाल्यास विश्वातील अज्ञाताचे अवलोकन करणे आपणांस शक्य होऊ शकेल असा विश्वास, ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस’च्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागातील वैज्ञानिक संवेद कोळेकर यांनी व्यक्त केला. सापेक्षतावादाचा सिद्धांताच्या अभ्यासातील पुढचे पाऊल हे ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’ सिद्धांताचे असेल. यासाठी ‘सापेक्षतावादाचा व्यापक सिद्धांत’ आणि ‘क्वांटम मेकॅनिक्स’ यांचा वापर करून नवीन सिद्धांत तयार करण्याचे प्रयत्न भारतासह जगभरातील वैज्ञानिक करीत आहेत. हा नवा सिद्धांत तयार झाल्यानंतर विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यास मदत होऊ शकेल, असा विश्वासही कोळेकर यांनी व्यक्त केला.
सापेक्षतावादाचा सिद्धांत
आयझ्ॉक न्यूटन यांनी सांगितलेल्या गतीच्या नियमांनुसार प्रकाश किरणांसह विद्युत-चुंबकीय लहरींची वागणूक स्पष्ट करता येत नाही आणि तो सिद्धांत विशिष्ट परिस्थितीमध्ये अभ्यास पुढे नेण्यास तोकडा पडतो. म्हणजे पृथ्वी व सूर्य हे गुरुत्वाकर्षण बलामुळे एकमेकांना धरून आहेत. पण समजा उद्या अचानक सूर्याने त्याचे स्थान बदलले तर न्यूटनने मांडलेल्या सूत्रातील एक घटक निरुपयोगी ठरतो. त्या परिस्थितीचे विश्लेषण आइन्सटाइन यांनी सापेक्षतावादाच्या व्यापक सिद्धांतात केले. प्रचंड वस्तुमानाच्या वस्तुमुळे त्या भोवताली असलेल्या अवकाशाला एक प्रकारची वक्रता येते. याचे उदाहरण म्हणजे सूर्याच्या प्रचंड वस्तुमानामुळे त्या भोवताली जे अवकाश आहे ते वक्र बनले आहे आणि त्या वक्र अवकाशात पृथ्वी सापडली आहे. पृथ्वी आपल्या मार्गाने सरळ जात असली तरीही अवकाशच वक्र असल्यामुळे ती सूर्याभोवती फिरताना दिसते. मग पृथ्वी सूर्यावर जाऊन आदळत का नाही? तर त्याचे कारण म्हणजे पृथ्वीचे स्वत:चे असलेले वस्तुमान आणि अवकाशात असलेला वक्रपणा. या सिद्धांतानुसार विद्युत-चुंबकीय लहरींचा वेग सापेक्ष परिस्थितीमध्ये नेहमी स्थिर असतो आणि निरीक्षकाच्या वेगावर आणि स्थळावर अवलंबून नसतो. म्हणजे आपली गाडी किती वेगाने धावते यावर प्रकाशाचा वेग अवलंबून नसतो. तो कोणत्याही परिस्थितीत स्थिर असतो. हा सिद्धांत मांडल्यानंतर त्यावर अनेक वैज्ञानिकांनी आक्षेप घेतले. या सिद्धांताची सत्यात पडताळण्यासाठी १९१९च्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्याचे निश्चित झाले आणि त्यानंतर हा सिद्धांत मान्य करण्यात आला.

भारत आणि सापेक्षतावाद
जगभरातील वैज्ञानिकांच्या बरोबरीनेच भारतातील वैज्ञानिकांनीही सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा अभ्यास केला. पण निधीच्या अडचणींमुळे हा अभ्यास करण्यास विलंब होत होता. यामुळे भारतीय वैज्ञानिक परदेशात जाऊन तेथे काही काळ राहून या सिद्धांताचा अभ्यास करू लागले. या अभ्यासाचे महत्त्व लक्षात आल्यानंतर यासाठी निधीची उपलब्धता होऊ लागली असून लवकरच आपल्या देशात या क्षेत्रातील भरीव काम होणे अपेक्षित असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.

सामाजिक बहिष्कार प्रकरणी गुन्हा
अलिबाग : मुरुड तालुक्यातील शिरगाव येथील वाळीत प्रकरणात अखेर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात समेट घडवण्याचा प्रयत्न केला होता. पीडित कृष्णा सातामकर यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. १९ नोव्हेंबर २०१४ पासून घराच्या व गोठय़ाच्या भोवती बांधकाम केले आहे. गावातील काही लोकांनी हे बांधकाम अतिक्रमण असल्याचे गावात सांगून त्यांच्याविरोधात ग्रामस्थांना चिथवले. यामुळे गावातील एकोप्याला बाधा आली असून गावकीने सातामकर यांच्याशी संबंध तोडले आहेत. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.