थायलंडमधील फुकेतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक या विषयावरील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतातल्या पाच विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण, तीन रौप्य पदक आणि एक सन्मानीय पदकाची कमाई करत भरघोस यश मिळवले आहे. या स्पर्धेमध्ये ४५ देशांमधील २१५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

आंतराष्ट्रीय ऑलिम्पियाडची ही स्पर्धा १२ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. टाटा मूलभूत अनुसंधान केंद्राचे होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्र हे सर्व आंतराष्ट्रीय स्पर्धाचे मुख्य केंद्र आहे. या केंद्राच्या माध्यमातूनच आंतराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पर्धकांची निवड केली जाते. या स्पर्धेसाठी तीन टप्प्यांमधून विद्यार्थ्यांची निवड केली गेली. पहिल्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर खगोलशास्त्र विषयावर परीक्षा घेण्यात आली असून यामध्ये देशभरातील १६ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. उर्वरित दोन टप्प्यांमध्ये लेखी आणि निरीक्षणात्मक परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये भारताकडून पाठविण्यात आलेल्या पाचही विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. यामध्ये आंध्र प्रदेशच्या मुलींची शेख वाजिद हिला सुवर्ण पदक मिळाले असून, मुंबईची नील करिया, नवी दिल्लीच्या नवनील सिंघल, कलकत्त्याच्या सस्वता बॅनर्जी यांना रौप्य पदक मिळाले आहे. तर अहमदाबादच्या पार्थ शास्त्रीला सन्मानीय पदक मिळाले आहे.