भारतीय हद्दीत लडाखमध्ये १९ किमी आत शिरून तंबू ठोकून बसलेल्या चिनी सैन्याला आक्रमकपणे परतवून लावण्याची मागणी वाढत असताना केंद्र सरकारने मात्र नरमाईची भूमिका घेतली आहे. ‘चीनची लडाखमधील घुसखोरी ही स्थानिक समस्या आहे’ असे सांगत पंतप्रधानांनी या घटनेला जादा महत्त्व देण्याचे टाळले. तर, तो भूभाग कोणाच्याही अधिपत्याखाली नसलेला ‘मानवरहित’ (नो मॅन्स लॅण्ड) असल्याचे सांगून केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी पंतप्रधानांच्याही एक पाऊल पुढे टाकले!
लडाख क्षेत्रातील भारतीय हद्दीत १९ कि.मी. इतक्या आतपर्यंत येऊन चीनच्या लष्कराने तेथे तंबू ठोकल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. चीनची घुसखोरी थोपवण्यासाठी भारताने आक्रमक पाऊल उचलावे, अशी मागणी विरोधी पक्षांसह यूपीएतील घटक पक्षांकडून केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर, पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याने वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. चिनी घुसखोरीबाबत पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य करताना पंतप्रधान म्हणाले,‘ही स्थानिक समस्या आहे. ती चर्चेच्या माध्यमातून सुटेल, अशी आमची आशा आहे. आमच्याकडे अन्य पर्यायही आहेत. मात्र आम्हाला परिस्थिती तणावग्रस्त करायची नाही.’ पंतप्रधानांचे हे वक्तव्य आले असतानाच सुशिलकुमार शिंदे यांनीही चर्चेतूनच मार्ग निघेल, असे सांगत या विषयाला अधिक महत्त्व देण्याचे टाळले. ‘तो भूभाग ‘नो मॅन्स लॅण्ड’ असून दोन्ही देशांचे सैन्य तेथून ये-जा करतातच,’ असे ते म्हणाले. मात्र, असे असल्यास भारताने ही घुसखोरी उजेडात आल्यानंतर चीनच्या राजदुतांकडे आक्षेप का नोंदवला, असा सवाल आता विचारण्यात येत आहे.