|| सौरभ कुलश्रेष्ठ

कोल इंडियाकडून महानिर्मितीला अपुरा कोळसा, भारनियमन टाळण्यासाठी आयात

देशातील वीजप्रकल्पांना कोळसा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या कोल इंडियाकडून महानिर्मितीच्या वीजप्रकल्पांना सातत्याने अपुरा कोळसा पुरवला जात असल्याने ती टंचाई भरून काढण्यासाठी २० लाख टन कोळसा परदेशातून आयात करण्यात येत असून त्यावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चापोटी सुमारे ७०० कोटी रुपयांचा भुर्दंड राज्यातील वीजग्राहकांवर पडणार आहे.

राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळासह देशातील सर्व राज्यांच्या वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा कोल इंडियाकडून होतो. महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक वीजप्रकल्पांची स्थापित क्षमता १० हजार १७० मेगावॉट आहे. त्यासाठी कोल इंडियाने वर्षांला ६० लाख मेट्रिक टन कोळसा पुरवणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत सातत्याने महानिर्मितीला अपुरा कोळसा मिळत आहे. ते प्रमाण ५७ टक्क्यांपर्यंत खाली आले आणि तब्बल ४३ टक्के कमी कोळसा पुरवला गेला. त्यातूनच पावसाने अचानक दिलेली ओढ, वाढलेले तापमान यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वीजमागणी अकस्मात वाढली. ती २४ हजार ९०० मेगावॉटपर्यंत वाढली होती. अपुऱ्या कोळशामुळे महानिर्मितीच्या प्रकल्पांतून अवघी पाच ते साडेपाच हजार मेगावॉट वीजनिर्मिती होत होती. त्यामुळे महावितरणला सरासरी सहा रुपये प्रति युनिट दराने बाजारपेठेतून वीज विकत घेतली. काही वेळा तो दर प्रति युनिट ८.७५ रुपयांपर्यंत गेला होता. इतकी महाग वीज महावितरणने घेऊनही काही प्रमाणात भारनियमन करणे भाग पडले होते.

कोल इंडियाकडून ६० लाख टनांपैकी फार तर ३६ ते ३८ लाख टन कोळसा पुरवला जाईल, असे स्पष्ट झाले आहे. आता पुन्हा उन्हाळ्यात वीजमागणी मोठय़ा प्रमाणात वाढते. यंदा त्याच काळात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी अपुऱ्या कोळशामुळे कमी वीजनिर्मिती होऊन भारनियमाची वेळ येऊ नये यासाठी महानिर्मितीने २० लाख टन कोळसा आयात करण्याचे जाहीर केले आहे. कोल इंडियाचा कोळसा सुमारे ३५०० रुपये प्रति टन या दराने मिळतो तर आयात कोळशासाठी थेट दुप्पट म्हणजेच सात हजार रुपये प्रति टन असा दर आहे.

परिणामी २० लाख टन कोळसा आयात करण्यासाठी महानिर्मितीला १४०० कोटी रुपये मोजावे लागतील. म्हणजेच कोल इंडियाच्या अकार्यक्षमतेमुळे देशांतर्गत कोळशापेक्षा ७०० कोटी रुपये अतिरिक्त खर्च महानिर्मितीला वीजनिर्मितीसाठी उचलावा लागणार आहे. नंतर या वाढीव खर्चाचा बोजा वीजदरवाढीच्या रूपात राज्यातील वीजग्राहकांवर पडणार आहे.

महानिर्मितीच्या विजेचा सरासरी दर चार रुपये १० पैसे प्रति युनिट आहे. आयात कोळशामुळे महानिर्मितीची वीजनिर्मिती क्षमता वाढून ती ७५०० ते ८००० मेगावॉटपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. पण त्याचबरोबर आयात कोळशाच्या वाढीव दराचा बोजाही पडेल. महानिर्मितीच्या विजेचा खर्च सरासरी ३० पैशांनी वाढेल.    – अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ.