03 June 2020

News Flash

भारतीय संस्कृतीचा ‘अलंकारिक’ ठेवा प्रदर्शनात

रोजच्या जगण्यात येणाऱ्या कोणत्याही वस्तूपासून दागिने तयार करण्याची कला कारागिरांना अवगत होती.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्राचीन दागिन्यांचे दालन

मुंबई : भारतीय संस्कृतीत दागिन्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळात भाजलेल्या मातीपासून तयार केलेली आभूषणे असोत की, सोन्याच्या अतिशय बारीक तारांपासून घडवलेले अलंकार असो, भारतीय दागिन्यांची कलाकुसर नजरेत भरणारी असते. असे असले तरीही पारंपरिक दागिन्यांच्या कलाकृतीची दखल घेणारा संग्रह आजतागायत होऊ शकला नव्हता. ही कमतरता ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’ने भरून काढली आहे. प्राचीन काळापासून वापरात असलेल्या आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या दागिन्यांचे एक विशेष दालन रविवारपासून प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे.

डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या अंगठय़ापर्यंत स्त्री सौंदर्य खुलवणारे आणि लढवय्या पुरुषाच्या वीरतेची ग्वाही देणारे अनेक अलंकार या दालनात पाहायला मिळतील. भारतीय कारागिरांनी दागिन्यांची कला धातूपुरती मर्यादित ठेवली नाही. रोजच्या जगण्यात येणाऱ्या कोणत्याही वस्तूपासून दागिने तयार करण्याची कला कारागिरांना अवगत होती. त्याचे प्रत्यंतर या प्रदर्शनात मांडलेले दागिने पाहिल्यावर येते. माशाच्या खवल्यांपासून तयार केलेला छोटासा हार, कवडय़ांची माळ आणि हत्तीच्या  केसांपासून तयार केलेली मनगटी संग्रहालयात आहे. खास दागिन्यांसाठी असलेले देशातील हे पहिले दालन अभिरक्षक मनीषा नेने आणि डॉ. उषा बालकृष्णन यांनी उभारले आहे.

राजे-महाराजे वापरत असलेले दागिने कायम आकर्षणाचे केंद्र असतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या दालनात प्राचीन काळात सामान्य कुटुंबात वापरले जाणारे दागिने प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. सिंधु, हडप्पा-मोहेंजोदडो, लोथल, कालिबंगन येथील संस्कृतीत लोकप्रिय असणारे हे दागिने आहेत. यात कार्नेलियन (लालसर दगड), जास्पर (सूर्यकांत मणी) आणि अ‍ॅगेट (गोमेट) यांसारख्या काही कमी मौल्यवान दगडांपासून बनवलेले मणी यांचाही समावेश आहे.

मुंडक्यांची माळ

दागिने परिधान करताना शारीरिक सुशोभीकरणाप्रमाणेच आरोग्यविषयक समस्या सोडवणे, नजर लागू न देणे किंवा वीरतेचे दर्शन घडवणे हासुद्धा हेतू असायचा. नागालँडच्या प्राचीन संस्कृतीतील पुरुष धातूच्या मुंडक्यांची माळ गळ्यात घालत. मुंडक्यांच्या संख्येवरून त्याने किती माणसांची शिकार केली याचा अंदाज येई. त्यावरून पुरुषाला गावात मानही मिळत असे. त्यावेळच्या दागिन्यांसोबत समाजाच्या विचारांचे दर्शनही या निमित्ताने या प्रदर्शनातून घडते.

दागिन्यांवरून स्त्रीशक्तीचा अंदाज

प्राचीन शिल्पांची चित्रे दालनात लावण्यात आली आहेत. त्यातील व्यक्तींनी परिधान केलेल्या दागिन्यांशी साधम्र्य सांगणारे दागिने चित्रांसोबत ठेवण्यात आले आहेत. प्राचीन स्त्रिया पायांत परिधान करत असलेल्या कडय़ांचे वजन काही किलोंमध्ये आहे. त्यावरून तत्कालीन स्त्रियांच्या ताकदीचा अंदाज येतो. जंगलातून चालताना विंचूला दूर ठेवण्यासाठी पायाच्या बोटांत घुंगरू लावलेले अलंकार घातले जात. त्याला बिछुवा हे नाव पडले. तेही या दालनात पाहायला मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 1:31 am

Web Title: indian cultural display jewellery akp 94
Next Stories
1 ध्वनिक्षेपक वापर निर्बंध शिथिल करा!
2 ट्रान्स हार्बर एसी लोकल शनिवार-रविवारीही
3 राज्यात थंडी पुन्हा अवतरणार?
Just Now!
X