आज केंद्रीकरण अनेकांना हवे असले, तरी भारतीय सांस्कृतिक विचारांत केंद्र आणि परीघ ही कल्पना नव्हती. मुळात येथे मोठय़ा प्रमाणावर वैविध्य असून, आपणास संस्कृती आणि परंपरांचे केंद्रीकरण धार्जिणे नाही, असे विचारगर्भ प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी केले. साहित्य अकादमीतर्फे दादर येथील अकादमीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ईशान्य आणि पश्चिम भारतीय साहित्य संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या दोनदिवसीय संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या हस्ते झाले. साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव, साहित्य अकादमीच्या आसामी सल्लागार समितीच्या करबी देका हजारिका हे मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
ईशान्य आणि पश्चिम भारतीय भाषांतील साहित्यिकांच्या या संमेलनातील नेमाडे यांच्या इंग्रजी भाषणाचा रोख हा संस्कृती आणि भाषा यांच्यातील वैविध्यावर आणि केंद्र व परीघ या वैचारिक गुंत्यावर होता. इंग्रजीतून केलेल्या आपल्या भाषणात हिंदुत्ववादी या अर्थाने हिंदुइस्ट हा शब्द वापरून ते म्हणाले, केंद्रीकरणाचा विचार फार तर आजचे हिंदुत्ववादी करू शकतात. परंतु हिंदु धर्मात झालेले प्रयत्न हे एकीकरणाचेच होते आणि त्यांतून अनेक केंद्रीत्व कायम राहिलेले आहे. आपल्या मुद्दय़ाच्या समर्थनार्थ त्यांनी भागवत धर्माचे महाराष्ट्रातील उदाहरण दिले. हिंदू धर्मातील सर्वात मोठा एकीकरणाचा प्रयत्न संतानी भागवत धर्माच्या माध्यमातून केला. पण तरीही वारकरी पंथात देहू व आळंदी ही ठिकाणे अनुक्रमे तुकाराम, ज्ञानेश्वर यांची केंद्रे म्हणूनच ओळखली जातात. अन्य संतांच्या बाबतीतही असेच सांगता येईल. मराठेशाहीतही असेच दिसते. तंजावरमधील भोसले काय किंवा ग्वाल्हेरचे शिंदे काय यांच्या वेशापासून वैविध्य दिसते. तेव्हा सगळयाच्या केंद्राकडे नव्हे तर विस्तारलेल्या परिघाकडे पाहावे, असे ते म्हणाले.

याच अनुषंगाने त्यांनी मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला. संस्कृत हीदेखील सर्व भाषांची जननी नव्हे. मराठीचे पूर्वरूप संस्कृतपेक्षाही जुने आहे. त्याचा संबंध अ‍ॅस्ट्रोलॉइड भाषा समुहाशी आहे, असे सोदाहरण सांगत त्यांनी संस्कृतपेक्षा मराठी जुनी याच मुद्दय़ावर तर आम्ही तिला अभिजात दर्जा मागत आहोत, असे विदित केले.

उद्घाटनपर भाषणात साधू म्हणाले, भारतात प्रादेशिक भाषांमधील विविधता असून आधुनिक भारताची एकसंघता ही प्रादेशिक भाषांमधील लेखनातून दिसून येते. एकेक भारतीय भाषा संपूर्ण भारताचे प्रतिनिधीत्व करते. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब भारतीय प्रादेशिक भाषांमधील साहित्यातून उमटते. इंग्रजीतून लिहिणारे भारतीय लेखक हे भारतीय किंवा प्रादेशिक संस्कृतीकडे उंच आकाशातून पाहतात तर प्रादेशिक भाषांमधून लिहिणारे लेखक याकडे जमिनीवर राहून पाहतात आणि व्यक्त होतात, अशी टिप्पणीही साधू यांनी केली. आपल्या भाषणाची सांगता साधू यांनी टेमसुला आओ यांच्या एका कवितेने केली.

करबी देका हजारिका यांचेही भाषण या वेळी झाले. के. श्रीनिवासराव यांनी प्रास्ताविक तर साहित्य अकादमी-मुंबईचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने यांनी सूत्रसंचालन केले.

उद्घाटन सोहळ्यानंतर काव्यवाचन कार्यक्रम झाला. त्यानंतर ‘मातृभाषेखेरीज भारतीय भाषेतील माझे आवडते पुस्तक’ या विषयावर विविध वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. रविवारी कथावाचन आणि अन्य सत्रे होणार आहेत. दोन दिवसांच्या या संमेलनात मराठीसह आसामी, गुजराती, कोकणी, बोडो, नेपाळी, सिंधी, मणिपुरी आदी भाषांमधील साहित्यिक, कवी सहभागी झाले आहेत.