क्रिकेटच्या मैदानातील चित्रीकरणापासून सुरक्षा टेहळणीपर्यंत ड्रोनकॅमेऱ्यांचा वापर आता सर्वत्र होऊ लागला आहे. परदेशात तसे प्रयोगही होऊ लागले आहेत. पण भारतात या ड्रोनच्या व्यावहारिक वापराची सुरुवात एका तरुण चमूने केली.

क्रिकेटचे मैदान असेल किंवा लग्न समारंभ असतील. इतकेच काय, तर खाणींचा शोध घ्यायचा असेल किंवा शत्रू पक्षातील हालचालींवर वेध ठेवायचा असेल तर सध्या मानवविरहित विमानाचा वापर होतो. याचा वापर खरे तर संरक्षण विभागासाठी महत्त्वाचा आहे. पण हे विमान भारतीय विद्यार्थ्यांनी बनवले व ते स्वस्तात उपलब्ध होऊ लागले. यामुळे याचा वापर आता क्रिकेटच्या मैदानापासून ते अगदी लग्नसमारंभातही होऊ लागला आहे. अर्थात तो मोठय़ा प्रमाणावर होत नसला तरी भविष्यात हा वापर नक्कीच वाढेल अशी आशा आहे. सामान्य माणसाला या विमानाची ओळख थ्री इडियट्स या चित्रपटातून झाली. यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पात या विमानाला आमूलाग्र स्थान मिळाले आणि त्यांनी यावर गुण मिळवत अभियांत्रिकीची पदवीही मिळवली. पण संपूर्ण भारतीय बनावटीचे हे विमान आयआयटीयन्स अंकित मेहता, राहुल सिंग, आशीष भट, अमरदीप सिंग यांनी विकसित केले. २००४मध्ये ज्या वेळेस टेहळणी करण्यासाठी किंवा सुरक्षा उपाय म्हणून मानवविरहित विमानाचा उपयोग होऊ शकतो ही संकल्पना शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन पातळीवर होती. त्यावेळेस या पाच जणांनी मिळून एक प्रकल्प हाती घेतला आणि मानवविरहित विमान विकसित केले.

आयआयटी मुंबईत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून हे सर्व एकत्रित आलो. रोबोकॉन या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी मॅकेनिकल शाखेचा विद्यार्थी अंकित तयारी करत होता. ही तयारी करत असताना इलेक्ट्रॉनिक्समधल्या अडचणी सोडविण्यासाठी दुसऱ्या एका विद्यार्थ्यांचा शोध घेत असताना आशीषशी भेट झाली. तर हॉवरक्राफ्ट विकसित करण्यासाठी जुन्या गाडय़ांमधील इंजिनांचा शोध घेत असलेला राहुल या दोघांना येऊन भेटला. त्यावेळेस अंकित आयआयटी मुंबईतील इनोव्हेशन विभागाचा प्रमुख होता. तेथे मानवविरहित विमानांवर काम करणारा अमरदीपला आम्ही आमच्यासोबत काम करण्यास विचारले. अशा प्रकारे आमचा चमू तयार झाला आणि आडिया फोर्जची स्थापना झाली. कंपनीचे काम सुरू झाल्यानंतर स्वित्र्झलडमधून एमबीएची पदवी घेतलेला अंकितचा मित्र विपुल जोशी कंपनीत सहसंस्थापक म्हणून सहभागी झाला. प्रत्यक्षात विपुलला ई-कचऱ्याचा स्वतंत्र व्यवसाय करायचा होता. मात्र अंकितशी चर्चा झाल्यानंतर त्याने आडिया फोर्जसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे एक चांगला चमू तयार झाल्यानंतर त्यांनी आपले उपकरण विकसित करण्यास सुरुवात केली. सुरुवातीचा काळ खूप अवघड होता. मुळात ही संकल्पनाच नवीन होती. यामुळे त्याला आर्थिक मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. यातच विविध स्पर्धामध्ये सहभागी होत ते त्यांची संकल्पना मांडू लागलो. त्यावेळेस सरकारी योजनेअंतर्गत आमच्या प्रकल्पाला काही निधी मिळाला. यानंतर आम्ही आमचे काम सुरू केल्याचे अंकितने सांगितले. संपूर्णत: स्वयंचलित हवाई वाहन तयार करण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर होते. यासाठी सर्व गोष्टी भारतीय बनावटीच्या वापरायचे आम्ही ठरविले. अखेर आम्ही आमचे स्वप्न प्रत्यक्षात आणले व पूर्णत: भारतीय बनावटीचा ड्रोन विकसित केला. त्यांनी यामध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाचे स्वामित्व हक्कही मिळवलेले आहे. आमच्या कंपनीला आयआयटी मुंबईतील नवउद्यमींना पाठबळ देणाऱ्या ‘साइन’ या संस्थेत खरे स्वरूप प्राप्त झाले. तेथे आम्ही आमच्या व्यवसायाला नवी दिशा देऊ शकलो असेही अंकित सांगतो. आमच्या उपकरणाची माहिती मिळताच आम्हाला डीआरडीओने बोलवले व आमची कार्यप्रणाली जाणून घेतली. यानंतर सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल, गुजरात पोलीस, महाराष्ट्र पोलीस, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अशा संस्थांमधून आमच्या उपकरणांना मागणी होऊ लागली व त्या संदर्भातील करार झाल्याचे अंकितने सांगितले. इंडिया फोर्जच्या या उपकरणांचा वापर नेपाळ मधील भूकंप असेल, उत्तराखंडमधील ढगफुटी असेल अशा विविध आपत्तींच्यावेळी करण्यात आला आहे.

भारतीय बनावटीचे मानवविरहित विमान बनविण्याच्या आव्हानापेक्षा आम्हाला सर्वात मोठे आव्हान हे निधी उभारणीचे वाटले. ते आव्हान आजही आमच्यासाठी कायम आहे. सुरुवातीला आम्हाला ‘साइन’मध्ये बीज भांडवल मिळाले. यानंतर बराच काळानंतर आयआयएम अहमदाबादने आम्हाला बीजभांडवल उपलब्ध करून दिले. यानंतर आम्हाला टप्प्याटप्प्याने निधी मिळत असल्याचे अंकितने सांगितले. भविष्यात आमचा व्यवसाय सुरक्षा यंत्रणांना सुसज्ज करण्यासाठी अधिक प्रयत्नशील असेल. तसेच खाजगी कंपन्यांमध्ये अथवा वैयक्तिक वापरासाठीही या उपकरणांचा वापर केला जाऊ शकतो. मात्र यासाठी सध्या काही कायदेशीर अडचणी आहेत. मात्र भविष्यात नक्कीच या अडचणी दूर होतील आणि ई-व्यापार संकेतस्थळं त्यांच्या वस्तू पोहचवण्यासाठी या उत्पादनाचा वापर करू शकतील अशी आशाही अंकितने व्यक्त केली आहे. सध्या देशात मोठय़ा प्रमाणावर नवउद्योग उभे राहात आहेत. मात्र यातील यशाचे प्रमाण कमी आहे. अशा उद्योगांना या यशस्वी उद्योजकाने मोलाचा सल्ला देताना सांगितले की कोणताही व्यवसाय सुरू करताना तुमच्याकडे योग्य चमू असणे आवश्यक आहे. हा चमूच तुमच्या व्यवसायाचे यशपायश ठरवू शकतो. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ग्राहकांना काय पाहिजे. ग्राहकांची मागणी पुरविणे हे नवउद्योगाचे काम आहे. यामुळे ग्राहकांना खूश करणे ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे भान कायम ठेवावे असा सल्लाही अंकितने दिला.

niraj.pandit@gmail.com

@nirajcpandit