राष्ट्रवादीत जुनेच चेहरे; प्रफुल्ल पटेल, तटकरे, विजयदादा लढणार

देशातील एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत राष्ट्रवादीमध्ये नेतेमंडळी सावध आहेत. नवीन चेहरे लढण्यास फारसे उत्सुक नाहीत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, विजयसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असून, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातच काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी आणि मतदारसंघनिहाय आढावा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवस घेतला. गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने लढविलेल्या मतदारसंघांबरोबरच काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या काही मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. देशातील एकूणच राजकीय वातावरण, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल यावर बरीच समीकरणे अवलंबून असल्याचे सांगण्यात आले. लोकसभा लढण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये तेवढी तीव्र स्पर्धा दिसली नाही. पाच राज्यांचे निकाल भाजपच्या विरोधात गेल्यास चित्र बदलू शकते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका नेत्याने व्यक्त केली.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे गेल्या मे महिन्यात पोटनिवडणुकीत विजयी झाले. पण या मतदारसंघावर ज्येष्ठ नेते व या मतदारसंघाचे आधी प्रतिनिधित्व केलेल्या प्रफुल्ल पटेल यांचा दावा असेल. पटेल की कुकडे हा वाद नको म्हणून भंडारा-गोंदिया मतदारसंघाचा आढावाच घेण्यात आला नाही. रायगडमधून लढण्याची घोषणा माजी मंत्री सुनील तटकरे यांनी केली असली तरी माजी मंत्री व तटकरे यांचे पक्षांतर्गत विरोधक भास्कर जाधव यांनीही दावा केला आहे. अनेक वर्षे आमदारकी भूषविल्याने आता लोकसभा लढण्याची इच्छा असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

नाशिक किंवा धुळे मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लढावे, अशी दोन्ही जिल्ह्य़ांतील नेत्यांची मागणी होती. पण स्वत: भुजबळ राज्याच्या राजकारणातच राहावे या मताचे आहेत. भुजबळ हे लोकसभा लढणार नाहीत. गेल्या वेळी नाशिक मतदारसंघातून भुजबळांचा पराभव झाला होता.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याचा अद्याप निर्णय झालेला नाही. माजी खासदार संजीव नाईक हे फार उत्सुक नसल्याचे समजते. परदेशी गेल्याने संजीव नाईक व त्यांचे आमदार बंधू संदीप बैठकीला उपस्थित नव्हते. गणेश नाईक यांच्यावर उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी सोपविण्यात येईल. कल्याणमध्ये माजी खासदार आनंद परांजपे यांनी लढण्यास नकार दिला आहे. विधान परिषद सदस्य आणि औषध विक्रेते संघटनेचे नेते जगन्नाथ शिंदे किंवा महेश तपासे यांच्या नावांचा विचार होऊ शकतो.

मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघातून मागे संजय पाटील हे विजयी झाले होते. त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल. याशिवाय मुंबईतील आणखी एक मतदारसंघ मिळावा, अशी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची मागणी होती.

साताऱ्यात उदयनराजेंना काहींचा विरोध

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी देण्यास पक्षातील काही जणांनी विरोध दर्शविला. त्यांच्या समर्थकांनी मात्र उदयनराजे यांच्या नावाचे समर्थन केले. उदयनराजे सातारा मतदारसंघाच्या आढावा बैठकीच्या वेळी उपस्थित नव्हते, पण नंतर ते कार्यालयात पोहचले. माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते -पाटील, तर कोल्हापूरमधून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात माजी मंत्री मनोहर नाईक किंवा त्यांचे पूत्र वा माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या नावांची चर्चा झाली. मावळसाठी काही जणांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पुणे मतदारसंघाबाबत विचार करण्यात आला.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह साऱ्या नेत्यांनी उमेदवारांची चाचपणी केली असून, मतदारसंघनिहाय आढावा घेतला. कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय नंतर घेतला जाईल. काँग्रेसबरोबर चर्चेत निवडून येण्याची क्षमता या आधारे जागांची मागणी केली जाईल. काँग्रेसबरोबरील चर्चा सकारात्मक आहे.      जयंत पाटील, आमदार राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष