News Flash

निवडणुकीपूर्वी प्रकल्प पूर्ण करण्याची धडपड

वातानुकूलित लोकल व स्थानकातील प्रवासी सुविधांवर भर

निवडणुकीपूर्वी प्रकल्प पूर्ण करण्याची धडपड
पीयूष गोयल केंद्रीय रेल्वेमंत्री

रेल्वे मंत्र्यांचे बैठकांचे सत्र; वातानुकूलित लोकल व स्थानकातील प्रवासी सुविधांवर भर

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काही रेल्वे प्रकल्प तसेच प्रवासी सुविधा मार्गी लावता येतात का यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची धडपड सुरू आहे. यासाठी मुंबईत बैठकांवर बैठका रंगत असून शुक्रवारी सहय़ाद्री येथे रेल्वेमंत्र्यांनी विविध रेल्वे प्रकल्प व सोयीसुविधा, समस्या जाणून घेण्यासाठी मुंबईतील सर्व पक्षांचे खासदार, आमदारांची बैठक बोलावली.

ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली सहावा मार्ग यासह वातानुकूलित लोकल, स्थानकातील प्रवासी सुविधा यासंदर्भातील मागण्या लोकप्रतिनिधींकडून रेल्वेमंत्र्यांना सादर करण्यात आल्या. या बैठकीला पश्चिम, मध्य आणि एमआरव्हीसीचेही (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) अधिकारी बोलावण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यातील ही सलग दुसरी बैठक होती.

गोयल यांची २३ ऑगस्ट रोजी राज्यातील रेल्वे प्रकल्प आणि प्रवासी सुविधांविषयी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याबरोबर  बैठक झाली होती. या बैठकीत मुंबईसाठी एकात्मिक तिकीट प्रणालीबरोबरच रेल्वे प्रकल्पांसाठी लागणारे भूसंपादन आणि प्रवासी सुविधांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीनंतर शुक्रवारी पुन्हा एकदा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेशी संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी सहय़ाद्री अतिथिगृहामध्ये खासदार, आमदारांची बैठक बोलावली होती. यामध्ये पश्चिम, मध्य रेल्वेबरोबरच एमआरव्हीसीचे अधिकारीही उपस्थित होते. गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग प्रकल्प पूर्ण केला जावा, मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली सहावा मार्ग, परळ ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग याचबरोबर अन्य प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात खासदार व त्यांच्या प्रतिनिधींकडून पत्र देण्यात आले. याशिवाय हँकॉक पुलाचे काम मार्गी लावा, लोअर परळ उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करा, रेल्वे स्थानकात पादचारी पूल, सरकते जिने बसविण्याची मागणीही उपस्थितांकडून करण्यात आली. या वेळी वातानुकूलित लोकल गाडीबद्दल विचारताच २१० वातानुकूलित लोकल येत्या काही वर्षांत येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

स्थानकांतील स्वच्छतेवर भर

स्थानकांतील स्वच्छतेवर भर दिला जात असून तसे आदेश मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना सांगितले. यामध्ये स्थानकातील प्रसाधनगृहे स्वच्छ करण्यात यावीत आणि त्यासाठी २ ऑक्टोबपर्यंत विशेष मोहीमही हाती घेतली जाणार आहे, असल्याचे ते म्हणाले.

ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन

ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग गेली अनेक वर्षे रखडला आहे. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी एमआरव्हीसीने मार्च २०२० ही मुदत ठरविली आहे. मात्र २०१९ च्याही आधी प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जावा, अशा सूचना रेल्वेमंत्र्यांनी केल्या आहेत. पण ते अशक्यच असल्याचे सूत्रांनी सागितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 2:11 am

Web Title: indian general election 2019 piyush goyal indian railways
Next Stories
1 कार्यकर्त्यांच्या गर्दीत रेल्वेमंत्री हरवले अन् खासदार, आमदार ताटकळले
2 उपनगरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा!
3 डेंग्यूने तिघांचा मृत्यू
Just Now!
X