भारतीय बोलीभाषेमध्ये मोठे सामथ्र्य असून, भारतीय बोलीभाषांचा आदर व्हायला हवा, असे प्रतिपादन नागालँड आणि आसामचे राज्यपाल पी.बी.आचार्य यांनी केले. शनिवारी मुंबई विद्यापीठात पूर्वोत्तर राज्यातील बोलीभाषा केंद्रांचे उद्घाटन राज्यपाल यांच्या हस्ते झाले. पूर्वोत्तर राज्यातील स्वातंत्र्यसेनानी राणी मा गाईदीनलीऊ यांच्या नावाने हे केंद्र लवकरच मुंबई विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे.
पूर्वोत्तर राज्यातील बोलीभाषा राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. या राज्यातील बोलीभाषांना एक समृद्ध संस्कृतीचा वारसा असून, पूर्वोत्तर राज्यातील सात राज्यांत जवळपास २०० हून अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. या भाषा शिकण्याचं एक मोठ दालन आता मुंबई विद्यापीठात उपलब्ध होणार आहे. पूर्वोत्तर भागातील ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागातील भाषा, बोलीभाषा बोलता-वाचता याव्यात यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये लवकरच भारतीय बोलीभाषेचे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख म्हणाले की, भाषेमुळे लोक जवळ येतात, सांस्कृतिक आणि भाषिक वैविध्यतेने नटलेल्या भारतामध्ये आदिवासी आणि ग्रामीण बोलीभाषांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने पूर्वोत्तर भागातील बोलीभाषा शिकण्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये शैक्षणिक केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून सहा महिन्यांचा प्रमाणपत्र आणि एक वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नागालँड येथील ग्रामीण भागात सहा दिवसांची भेट दिल्यानंतरच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हा अभ्यासक्रम दीड ते दोन महिन्यांत सुरू करता येणे शक्य होणार असून यासाठी सध्या विद्यापीठात शिकत असलेल्या त्या भागातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असल्याचेही ते म्हणाले.