News Flash

मानसिक आजाराबाबत नियमावली तयार

या नियमावलीला शासनाकडून लवकर मान्यता मिळाल्यास मनोरुग्णांना खऱ्या अर्थाने आधार मिळेल

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य, मुंबई

मानसिक आजारावरील उपचाराची दिशा निश्चित करण्यासाठीचा कायदा मंजूर होऊन दोन वर्षे उलटल्यानंतर आरोग्य विभागाने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मसुदा नियमावली तयार केली आहे. ही नियमावली लवकरच मंजुरीसाठी सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या राज्यात ‘मेंटल हेल्थ अ‍ॅक्ट १९८७’ नुसार मनोरुग्णालयांचे कामकाज चालत असून २०१७ मध्ये मानसिक आजारासंदर्भात नवीन कायदा मंजूर करण्यात आला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली मसुदा नियमावली तयार करण्यात आली नव्हती. आता ती तयार करण्यात आली असून, लवकरच आरोग्य विभागाकडून अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

ही नियमावली तयार करताना प्रामुख्याने मनोरुग्णांच्या हक्कांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून लहान मुलांना उपचारासाठी दाखल करणे व आवश्यक ते उपचार करण्यापूर्वी जिल्हा आढावा बोर्डाकडून मंजुरी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मनोरुग्णांचे पालकत्व तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कर्तव्य, मनोरुग्णाचे उपचारांनंतरचे पुनर्वसन याबाबतही मसुद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत. कोणालाही बळजबरीने मनोरुग्ण ठरवून मनोरुग्णालयात दाखल करता येऊ नये यासाठी आवश्यक तरतूद मसुद्यामध्ये करण्यात आल्याचे डॉ. तायडे यांनी सांगितले. राज्यातील पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी या आरोग्य विभागांच्या चार मनोरुग्णालयांत एकूण ५६९५ खाटा आहेत. तेथे वर्षांकाठी सुमारे एक लाख ७० हजार रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात येतात तर ३५०० रुग्ण दाखल असतात. या नियमावलीला शासनाकडून लवकर मान्यता मिळाल्यास मनोरुग्णांना खऱ्या अर्थाने आधार मिळेल, असे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 2:51 am

Web Title: indian legal system mental health mental health act zws 70
Next Stories
1 मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा
2 प्रगतीसाठी कोशातून बाहेर पडणे गरजेचे!
3 Mumbai Monsoon : पावसाची दडीच!
Just Now!
X