पंतप्रधानांच्या व्यक्तव्याचा ‘आयएमए’कडून निषेध

 मुंबई : भारतीय डॉक्टरांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन येथे केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेले राज्यभरातील डॉक्टर येत्या गुरूवारी म्हणजेच २६ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या(आयएमए) महाराष्ट्र विभागाने जाहीर केले आहे.

लंडनमधील ‘भारत की बात सबके साथ’ या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील डॉक्टर औषधनिर्मात्या कंपन्यांनी आयोजित केलेल्या परदेशी सहलींसाठी जातात, अशी टीका केली होती. मोदींच्या या वक्तव्यामुळे देशभरातील डॉक्टर समुदाय संतप्त झाला असून याविरोधात निषेध नोंदविणारे जाहीर पत्र आयएमएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

भारतीय डॉक्टर त्यांच्या कौशल्यासाठी जगभरात नावाजले जातात. तेव्हा अशा शब्दांमध्ये भारतीय वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा मलीन करणारी भाषा पंतप्रधानांनी वापरणे अपेक्षित नाही, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विधेयकाला आयएमएने विरोध केल्यामुळे अशा प्रकारची टीका तर केली जात नाही ना, अशी शंकाही या पत्रामध्ये व्यक्त केली आहे. औषधांच्या किंमतीवर डॉक्टरांचे नाही तर सरकारचेच नियंत्रण आहे. तेव्हा पंतप्रधानांनी केवळ लोकप्रियतेसाठी केलेल्या शेरेबाजीमुळे  प्रामाणिक डॉक्टरांचा अपमान झाला असून संपूर्ण डॉक्टर समुदायाकडून या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे, असे या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले.

या पाश्र्वभूमीवर आयएमएअंतर्गत राज्यभरातील सर्व डॉक्टरांकडून येत्या २६ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे, असे आयएमएचे राज्य सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी सांगितले.