नीलेश अडसूळ, अमर सदाशिव शैला

स्टॉलधारकांकडून खरेदीची पावती देण्यास टाळाटाळ; प्रशासनाकडून सातत्याने उद्घोषणा तरीही प्रवासी उदासीन:- रेल्वे स्थानकांवरील अधिकृत विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ तसेच अन्य वस्तूंची मनमानी दरांत विक्री केली जाऊ नये, यासाठी प्रत्येक खरेदीनंतर ग्राहकाला पावती देणे अनिवार्य करण्याची सक्ती रेल्वे प्रशासनाने केली आहे. मात्र, रेल्वे स्थानकांतील स्टॉलधारक व कंत्राटदारांकडून ही सक्ती धाब्यावर बसवली जात आहे. ग्राहकांनी मागणी केल्याखेरीज त्यांना पावती दिली जात नाही; पण त्याचबरोबर प्रवासीही याबाबतीत आग्रही नसल्याचे दिसून येत आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उद्घोषणा कक्षांमधून ‘खाद्यपदार्थाची खरेदी केल्यावर दुकानदारांनी बिले दिली नाहीत, तर पैसे देऊ नका’, अशी घोषणा केली जात आहे. मात्र, दादर, कुर्ला, शीव, भायखळा, सीएसएमटी, चर्चगेट, लोअर परेल आदी स्थानकांवरील दुकानांमध्ये ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी खाद्यपदार्थाची खरेदी केली असता एकाही ठिकाणी विनामागता पावती देण्यात आली नाही.

रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही पूर्ण कर आकारता यावा यासाठी कंत्राटदारांना बिल मशीन देण्यात आले. याला एक वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. म्हणून रेल्वेने पुन्हा जागरूकता मोहीम हाती घेतली. त्याला महिना उलटून गेला तरी परिस्थिती जैसे थे आहे. विक्रेत्यांना बिल का दिले जात नाही, याविषयी कंत्राटदारांना विचारले असता, आम्ही बिल देतो, पण गर्दीच्या वेळी शक्य होत नाही आणि ग्राहक बिल मागत नसल्याने आम्हीही ते देत नाही, असे शीव स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील एन. आर. वजिरानी या स्टॉलवरील विक्रेत्यांनी सांगितले, तर कु र्ला स्थानकातील फलाट क्रमांक ४ वरील चंदुलाल अँड सन्स या स्टॉलवर पंधरा मिनिटांच्या कालावधीत तब्बल ३५ ते ४० ग्राहकांनी खाद्यपदार्थ खरेदी के ले; परंतु एकाही ग्राहकाला बिल देण्यात आले नाही. त्याविषयी विचारले असता स्टॉलवरील विक्रेत्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत बिल द्यायला सुरुवात के ली व काही वेळातच पुन्हा बिल देणे बंद केले.

भायखळा स्थानकातील फलाट क्रमांक ३ वरील सी. के . गुप्ता स्टॉलवर दिवसभरात एकही बिल देण्यात आले नव्हते. शिवाय मशीनमध्ये बिघाड असून अनेकदा तक्रार करूनही कु णी दुरुस्तीसाठी आले नसल्याचे विक्रेत्याने सांगितले. तर लोकांना खाद्यपदार्थ देईपर्यंत धीर नसतो, तर बिल घेईपर्यंत कु ठे असणार? अनेक बिले तयार करून आमच्याकडेच पडलेली असतात. बिल देण्याला आमची हरकत नाही, परंतु ग्राहकांचे सहकार्यही आवश्यक आहे, असे सीएसएमटी स्थानकातील एस. सी. गुप्ता स्टॉलवरील विक्रेत्याने सांगितले. दादर स्थानकातील पश्चिम रेल्वेचे फलाट क्रमांक १ वरील मस्कर्नास नारोह अ‍ॅण्ड सन्स टी रिफ्रेशमेन्ट स्टॉल, फलाट क्रमांक २ वरील प्रफुलचंद अ‍ॅण्ड कंपनी ज्युस स्टॉल, तर लोअर परेलच्या राजेंद्र प्रसाद जैन टी स्टॉलवरही हाच अनुभव आला.

ग्राहक अनभिज्ञ

प्रवाशांना विचारले असता, अनेकांना याविषयी काहीच माहिती नव्हती. स्टॉलवरील ‘बिल नाही तर शुल्क नाही’ हे फलक दर्शनी भागाच्या काहीसे वर लावल्याने सहज दिसत नाहीत.

मुंबईत सुरू झालेली ही मोहीम आज राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. बिल घेणे अनिवार्य आहे ही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्टॉलधारकांकडून बिल दिले जात नसल्यास योग्य ती कारवाई रेल्वे प्रशासनाकडून के ली जाईल – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क  अधिकारी, मध्य रेल्वे

पश्चिम रेल्वेकडून पाहणी केली जात असून ग्राहकांना बिल न देणाऱ्या दुकानांवर कारवाई करून त्यांना दंड आकारला जात आहे. त्याचबरोबर ग्राहकांनीही बिल न देणाऱ्या विक्रेत्यांना पैसे देऊ नयेत. – रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, प. रेल्वे