03 June 2020

News Flash

भारतीय रेल्वेची मालवाहतूक तोटय़ातच!

४८१२ कोटी रुपयांनी उत्पन्न घटले

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रेल्वेमंत्र्यांचा फायद्याचा दावा फसवा; ४८१२ कोटी रुपयांनी उत्पन्न घटले

अनेक वर्षांनंतर भारतीय रेल्वे प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही उत्पन्नांमध्ये फायद्यात आल्याचा दावा रेल्वेमंत्र्यांसह संपूर्ण रेल्वे मंत्रालय करत असताना प्रत्यक्षात रेल्वेच्याच अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वेच्या मालवाहतुकीचे उत्पन्न ४.४० टक्क्य़ांनी घसरले आहे. हा आकडा ४८१२ कोटी रुपये एवढा प्रचंड असून प्रति टन प्रति किमी वाहतुकीचा आकडाही लक्षणीयरीत्या घसरला आहे. विशेष म्हणजे ही घसरण गेली दोन वर्षे सुरू असून भविष्यातही ती कायम राहण्याची शक्यता आहे.

भारतीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे रेल्वेने एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर केले होते. या आकडेवारीनुसार प्रवासी संख्येत ७० दशलक्ष प्रवाशांची भर पडली, तर उत्पन्न दोन हजार कोटी रुपयांनी वाढले. या आकडेवारीबद्दल रेल्वे स्वत:ची पाठ थोपटून घेत असताना रेल्वेच्या उत्पन्नातील सर्वाधिक वाटा असलेल्या माल वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न कमालीचे घटले आहे.

२०१५-१६ या वर्षांत माल वाहतुकीतून रेल्वेला १,०९,२८६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. २०१६-१७ या वर्षांत हा आकडा १,०४,४७४ कोटी रुपयांवर आला आहे. म्हणजेच रेल्वेला ४८१२ कोटी रुपयांच्या माल वाहतुकीच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. यातील गांभीर्याची बाब म्हणजे रेल्वेने किती टन माल किती किलोमीटर वाहून नेला, यावर हा उत्पन्नाचा आकडा अवलंबून असतो. त्याला ‘एनटीकेएम’ किंवा नेट टन किलोमीटर असे म्हणतात. म्हणजे रेल्वेने एक टन माल शंभर किलोमीटर वाहून नेला आणि दहा टन माल २० किलोमीटर वाहून नेला, तर रेल्वेला दुसऱ्या प्रकारात जास्त उत्पन्न मिळते. मात्र हा आकडाही २०१५-१६च्या तुलनेत ३६०८१ ने कमी झाला आहे. २०१५-१६ या वर्षांत रेल्वेने ६,५५,६०७ दशलक्ष एनटीकेएम वाहतूक केली होती. हा आकडा २०१६-१७ या वर्षांत ६,१९,५२६ दशलक्ष एवढा खाली आला आहे.

भविष्यात समस्या वाढण्याची शक्यता

  • ’ रेल्वेची माल वाहतूक कमी होण्यासाठी विविध घटक कारणीभूत असून त्यात जल वाहतुकीचा वाटा मोठा असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. याआधी ओडिशा, बिहार, झारखंड येथील कोळशाच्या खाणींमधून महाराष्ट्रात रेल्वेने येणारा कोळसा आता कोलकाता किंवा जवळच्या बंदरापर्यंत रेल्वेने जातो आणि त्यापुढे तो बोटीने पाठवला जातो. त्याशिवाय रस्त्यांची स्थिती सुधारल्याने जवळच्या अंतरावरील माल वाहतूक रस्त्यांवरूनही केली जाते.
  • ’ माल वाहतुकीत झालेली ही घट यंदाची नसून सलग दोन वर्षे माल वाहतूक कमी होत चालली आहे, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले. माल वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न सलग दोन वर्षे कमी होत असल्याने रेल्वेपुढील समस्या भविष्यात वाढू शकतात, अशी चिंताही या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2017 1:56 am

Web Title: indian railways goods transport in loss
Next Stories
1 ‘शिफु संस्कृती’प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश
2 उपयोजित कला शाखेच्या परीक्षेत थेट अनुकरणाचीच मुभा!
3 आगाऊ पाणीपट्टी न भरल्यास पिण्याच्या पाण्याचे आरक्षण रद्द
Just Now!
X