24 February 2021

News Flash

तिकीट आरक्षणात आता ‘विकल्प’!

१२ तासांत सुटणाऱ्या गाडय़ांत जागा

( प्रतिकात्मक छायाचित्र )

प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना नियोजित गाडीनंतर १२ तासांत सुटणाऱ्या गाडय़ांत जागा

 महत्त्वाच्या कामासाठी एखाद्या ठिकाणी जायला रेल्वेचे तिकीट आरक्षित केले, मात्र प्रतीक्षा यादीतील तिकीट शेवटपर्यंत ‘कन्फर्म’ झाले नाही. अशा वेळी प्रवास करणे शक्य होत नसल्याने प्रवाशांची होणारी अडचण लक्षात घेत आता आयआरसीटीसीने अशा प्रवाशांना ‘विकल्प’चा पर्याय दिला आहे. तिकीट आरक्षण करताना या ‘विकल्प’ची निवड केल्यास ज्या गाडीचे तिकीट आरक्षित केले आहे, ती गाडी सुटल्यानंतरच्या १२ तासांमध्ये संबंधित ठिकाणी जाणाऱ्या गाडय़ांची आरक्षण यादी तपासली जाणार आहे. या गाडय़ांपैकी एखाद्या गाडीत आरक्षण उपलब्ध असेल, तर प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता दुसऱ्या गाडीतून प्रवास करता येईल. १ एप्रिलपासून या सेवेची सुरुवात झाली आहे. सध्या ही सेवा संगणकीय तिकीट प्रणालीद्वारे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठीच उपलब्ध आहे.

तिकीट आरक्षित करताना प्रतीक्षा यादीतील तिकिटालाही पसंती दिली जाते. ते तिकीट निश्चित होईल, या आशेपोटी प्रवासाचा दिवस उजाडेपर्यंत प्रवासी वाट पाहतात. आरक्षित तिकिटांचा अंतिम तक्ता गाडी सुटण्याच्या चार तास आधी तयार होतो. त्या वेळीही तिकीट निश्चित झाले नाही, तर प्रवासाला मुकावे लागते. अनेकदा अनेक जण महत्त्वाच्या कामांसाठी प्रवास करतात. त्यामुळे त्यांना नियोजित ठिकाणी पोहोचणे आवश्यक असते.

अशा प्रवाशांची सोय करण्यासाठी आयआरसीटीसीने तिकीट आरक्षण करतानाच ‘विकल्प’ हा पर्याय निवडण्याची सोय केली आहे. प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट आरक्षण करताना या ‘विकल्प’ची निवड केल्यानंतर उर्वरित काम संगणकीय प्रणाली करते.

काम कसे होते?

मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसचे प्रतीक्षा यादीतील तिकीट असेल आणि अंतिम तक्ता तयार झाल्यानंतरही ते निश्चित झाले नाही, तर संगणकीय प्रणालीद्वारे मुंबई सेंट्रल, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या जवळच्या कक्षेतील टर्मिनसवरून सुटणाऱ्या आणि दिल्लीला जाणाऱ्या गाडय़ांची आरक्षण यादी तपासली जाते. राजधानी एक्सप्रेस सुटण्याच्या वेळेपासून पुढील १२ तासांमध्ये सुटणाऱ्या गाडय़ाच लक्षात घेतल्या जातात. या गाडय़ांपैकी एखाद्या गाडीत आरक्षण उपलब्ध असेल, तर प्रतीक्षा यादीत असलेले तिकीट त्या गाडीसाठी निश्चित होऊ शकते. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्कही आकारले जात नाही.

श्रेणीमध्ये फरक नाही

एखाद्या प्रवाशाने शयनयान श्रेणीचे प्रतीक्षा यादीतील तिकीट काढले असेल, तर ‘विकल्प’द्वारे दुसऱ्या गाडीत त्याला शयनयान श्रेणीचेच आरक्षण उपलब्ध होते. थर्ड एसी श्रेणीत जागा रिकाम्या असल्यास ते तिकीट त्याला दिले जात नाही. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना फक्त ऑनलाइन तिकीट आरक्षण करताना ‘विकल्प’चा पर्याय निवडायचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 12:43 am

Web Title: indian railways on waiting list ticket
Next Stories
1 जाहिरातींद्वारे तरुणांना भुरळ पाडून लूटणारी टोळी गजांआड
2 आंबेडकरी तरुणांमध्ये अस्वस्थता
3 २० लाख शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचा प्रस्ताव!
Just Now!
X