19 November 2019

News Flash

रेल्वेतील नोकरीच्या नावाखाली शेकडो तरुणांना गंडा

एकटय़ा मुंबईतून अडीच कोटींहून अधिक रकमेची फसवणूक

एकटय़ा मुंबईतून अडीच कोटींहून अधिक रकमेची फसवणूक

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार, गरीब तरुणांना गंडा घालणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती अवघ्या देशभर पसरल्याचे समोर येत आहे. या टोळीने गंडवलेले ३३ तरुण आतापर्यंत पुढे आले असून त्यांच्याकडून लाटलेली रक्कम दोन कोटी ६६ लाखांच्या घरात आहे. प्रत्यक्षात या टोळीने महाराष्ट्रासह देशभरात फसवणुकीचे जाळे पसरवले असून अनेक गाव-शहरांतून तरुण मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रारी करत आहेत.

गुन्हे शाखेच्या कांदिवली कक्षाने राजेशकुमार तांती, सरोजकुमार राय, सीमा पवार, डबलूकुमार तांती आणि अजयकुमार राय या पाच जणांना गजांआड केले. यापैकी राजेश आणि सरोज हे टोळीतील मुख्य आरोपी आहेत. या दोघांनी २०१२ पासून भारतीय रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करून बेरोजगार तरुणांना आपल्या जाळय़ात ओढले. मुंबईसह देशभरात अनेक तरुणांनी या फसवणुकीबाबत तक्रारी दाखल केल्या. मात्र, गेल्या सात वर्षांत पोलीस यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. या दोघांनी दलाल आणि मध्यस्थांची अशी साखळी निर्माण केली होती की, मुख्य सूत्रधारापर्यंत तपास पोहोचत नव्हता. गुन्हे शाखेच्या कांदिवली कक्षाने मात्र गुंतागुंतीच्या तांत्रिक तपासावर भर देत या दोघांनाच बेडय़ा ठोकल्या.

गुन्हे शाखेचे तत्कालीन सहआयुक्त अशुतोष डुंबरे यांच्याकडे १५ ते २० तरुणांची एकत्रित तक्रार आली तेव्हा त्यांनी तपासाची जबाबदारी कांदिवली कक्षाकडे सोपवली. कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव आणि पथकाने ही तक्रार गांभीर्याने घेत मुख्य आरोपींना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला. तांत्रिक तपासाआधारे दलालांसह तांती, राय यांचा उत्तर प्रदेशातील ठावठिकाणा शोधला. आरोपींना अटक केली. आतापर्यंत आरोपींकडून सुमारे दोनशे उमेदवारांसाठी तयार केलेली बोगस नियुक्तिपत्रे, ओळखपत्रे, प्रशिक्षण, वैद्यकीय चाचण्यांशी संबंधित कागदपत्रे आणि ५० लाख रुपयांची रोकड, दागिने हस्तगत झाले. त्यांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या विविध शहरांसह गुजरात, कर्नाटक, केरळ, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, झारखंड, उत्तराखंड आदी राज्यांमधून आपलीही फसवणूक झाल्याची माहिती देणारे फोन कांदिवली कक्षाला येत आहेत.

तक्रारीची दखल न घेतल्याचा परिणाम?

मनीषकुमार सिंह हे सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथील व्यवस्थापक कार्यालयात चीफ पर्सनल ऑफिसर (सीपीओ) या सचिव दर्जाच्या पदावर नेमणुकीस आहेत. त्यांचे नाव वापरून तांती, राय यांनी आजवर हजारो तरुणांना फसवले. ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार २०१३ पासून फसवणूक झाल्याची जाणीव होताच खातरजमा, चौकशी करण्यासाठी विविध राज्यांमधून तरुण खऱ्या मनीषकुमार यांना भेटण्यासाठी येऊ लागले. हे प्रकार वाढल्यावर मनीषकुमार यांनी वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पोलिसांकडे तक्रारीही केल्या. त्या गांभीर्याने घेत तेव्हाच तपास झाला असता तर हजारो तरुणांची फसवणूक टळू शकली असती.

चित्रपटनिर्मितीआड फसवणुकीचे दुकान

राजेशकुमारने चित्रपटनिर्मितीसाठी कंपनीची नोंदणी केली. गोरेगाव येथील वास्तव्यात त्याने स्वत:ला निर्माता म्हणून भासवले. कार्यालयात किरकोळ कामांसाठी त्याने आरोपी सीमा पवारला पगारावर ठेवले. साथीदार सरोज राय याला रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकारी मनीषकुमार भासवले. सरोज म्हणजेच तोतया मनीषकुमारने अनेक तरुणांना रेल्वेत परस्पर नोकरीला लावल्याचे सीमाला पटवून दिले. त्यानंतर सीमाने स्वत:हून २० ते २५ तरुण गोळा केले. प्रत्येकाकडून सुरुवातीला दोन लाख रुपये, तर बोगस नियुक्तिपत्र हाती दिल्यानंतर पाच लाख उकळण्यात आले. सीमाला तिची दलाली देण्यात आली. प्रत्येक शहरात सीमाप्रमाणे स्थानिक दलालांकरवी तांती, राय यांनी फसवणूक सुरू ठेवली. अनेक प्रकरणांमध्ये दलालांनी स्वत:ची दलाली जोडून उमेदवारांकडून १० ते १५ लाख उकळले आहेत.

व्यापाऱ्यालाही गंडा

या टोळीने रेल्वेचे भंगार स्वस्तात विकतो म्हणून गुजरातमधील एका व्यापाऱ्याला सहा कोटींचा गंडा घातल्याची माहिती गुन्हे शाखेला या कारवाईनंतर मिळाली. या प्रकरणातही रेल्वे अधिकारी मनीष सिंह यांच्या नावाचा वापर केला गेला. अशा प्रकारे या टोळीने मुंबईत फसवणूक केली आहे का, याचाही तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

First Published on June 12, 2019 2:38 am

Web Title: indian railways recruitment fake job
Just Now!
X