जहाजांवर विवाह सोहळे घेण्याकडे श्रीमंतांचा भर; ४० लाखांपासून एक कोटींपर्यंतचा खर्च

सुहास जोशी, मुंबई</strong>

सभोवार निळाशार समुद्र, वर आकाशाची निळाई आणि क्रूझच्या डेकवर सुरू असलेला विवाह सोहळा हे आता केवळ एखाद्या चित्रपटातील दृश्य नसून गेल्या काही वर्षांत क्रूझवर होणाऱ्या विवाह सोहळ्यांचे आहे. ‘डेस्टिनेशन वेडिंग’ ही संकल्पना गेल्या काही वर्षांत चांगलीच लोकप्रिय होत असताना त्यापाठोपाठ आता ‘क्रूझ वेडिंगची’ हौसदेखील हळूहळू वेग धरू लागली आहे. अशा विवाह सोहळ्यांसाठी तब्बल ४० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची यजमानांची देखील तयारी असल्याने हे सोहळे वाढले आहेत.

विवाह सोहळा हा भारतीयांच्या खर्च करण्याचे व्यवच्छेदक लक्षण असल्यामुळे त्यासाठी असंख्य क्लृप्त्या लढवल्या जातात. काही तरी हटके करून हा सोहळा साजरा करण्यावर सर्वाचाच भर असतो. त्यामुळेच क्रूझ वेडिंगलादेखील पसंती मिळत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या क्रूझवर किमान १५०० ते २००० व्यक्तींची सोय असते.

संपूर्ण क्रूझ भाडय़ाने घेणारे असे प्रसंग विरळाच असले तरी १०० ते ३०० निमंत्रितांसाठी विवाह सोहळ्यांचे प्रमाण दिसून येत असून, क्रूझ कंपन्यांनी त्यासाठी स्वतंत्र पॅकेजेस तयार केली आहेत. प्रतिव्यक्ती चार दिवसांच्या क्रूझ प्रवासासाठी तीस ते चाळीस हजार रुपये आकारले जातात. या खर्चात क्रूझवर अनेक सुविधांचा समावेश असल्यामुळे त्यांचा फायदा वऱ्हाडाला घेता येतो. त्यामुळे यजमानांना वऱ्हाडाकडे सतत लक्ष देण्याची गरज उरत नाही असे क्रूझ कंपन्यांचे अधिकारी सांगतात.

गेल्या दोन वर्षांत कोस्टा क्रूझवर सात भारतीय विवाह सोहळे झाले असून तीन वर्षांपूर्वी संपूर्ण क्रूझच भाडय़ाने घेऊन परदेशवारीत क्रूझ वेडिंग झाले होते. तर रॉयल कॅ रेबियन क्रूझवर तीन वर्षांत सहा भारतीय विवाह सोहळे झाले आहेत. क्रूझ प्रवासाचे ठरलेले वेळापत्रक आणि विवाहाचे मुहूर्त यांची सांगड अनेकदा घातली जाणे शक्य होत नसल्यामुळे ही संख्या तशी मर्यादित असल्याचे क्रूझचे अधिकारी सांगतात.

पंचतारांकित सुविधा : लग्न समारंभानुसार क्रूझवरील विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी क्रूझ कर्मचारी असतात, त्यामुळे धार्मिक विधींवर लक्ष ठेवणे यजमानांना शक्य होते. क्रूझवरील करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये विवाह सोहळ्यासाठी विशेष कार्यक्रमदेखील सादर केले जातात. त्याचबरोबर लग्नसोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम असणारे भोजनासाठीदेखील विविध सुविधा मिळतात. जैन धर्मीयांच्या पद्धतीने भोजन सुविधादेखील क्रूझवर उपलब्ध असते. थोडक्यात येत्या काळात विवाह सोहळ्यांच्या आयोजनासाठी क्रूझ वेडिंगकडे कल वाढण्याची शक्यता दिसत आहे.

एकाच वेळी डेस्टिनेशन वेडिंग आणि क्रूझ प्रवास असा अनुभव यामध्ये निमंत्रितांना मिळतो. विवाह सोहळ्यानुसार क्रूझवरील सुविधांचे नियोजन केले जाते. त्यामुळे इतर प्रवासी जरी क्रूझवर असले तरी विवाह सोहळ्यातील निमंत्रितांना ते अडचणीचे ठरत नाहीत.

–  नलिनी गुप्ता, ‘कोस्टा क्रूझ’ व्यवस्थापकीय संचालिका

क्रूझ वेडिंग हे खूपच खर्चीक असते ही भावना आता उरलेली नाही, किंबहुना क्रूझ वेडिंगमध्ये एकाच वेळी अनेक बाबींचा आनंद तर मिळतोच, पण सोहळा हटके करणाऱ्यांचा कल याकडे झुकू लागला आहे.

– वरुण चढ्ढा, ‘रॉयल क्रूझ’ कंपनीचे प्रतिनिधी