रशियामध्ये झालेल्या ४५व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये दोन सुवर्ण व दोन रौप्य अशा चार पदकांवर भारताने आपली मोहोर उमटवली आहे. त्याचवेळेस ग्रीसमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅस्ट्रॉनॉमी आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्स ऑलिंपियाडमध्येही भारताची कामगिरी दमदार राहिली असून दोन रौप्य व तीन कांस्य पदकांसह पाच पदकांची कमाई केली.
रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये जगभरातून ७३ देश सहभागी झाले होते. भारतातर्फे चार विद्यार्थ्यांच्या चमूने या स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. सिकंदराबादचा एन. एस. साई रित्विक आणि जयपूरचा पार्थ शहा हे दोघे प्रत्येकी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. तर इंदूरचा अनमोल अरोरा आणि कोलकात्याचा अभिषेक दास यांनी प्रत्येकी रौप्य पदकाची कमाई केली आहे.
अ‍ॅस्ट्रॉनॉमी आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्येही भारताची कामगिरी अशीच भरीव राहिली आहे. जोधपूरच्या कुमार अयुष, अमरावतीचा संदेश कलंत्रे यांनी प्रत्येकी रौप्य पदकावर मोहोर उमटवली. तर जयपूरचा शेशांश अगरवाल, नॉएडाचा आशुतोष मारवा आणि नागपूरचा अरिंद्रम भट्टाचार्य यांनी प्रत्येकी ब्रॉन्झ पदकावर नाव कोरले आहे.
‘होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रा’तर्फे रसायनशास्त्र विषयात देशस्तरावर घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतरच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यावर लेखी आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्वरूपाची परीक्षा घेऊन निवडक चार विद्यार्थ्यांना ऑलिंपियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देण्यात आली. रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये प्रा. सविता लाडगे, प्रा. सुधा जैन, गोमथी श्रीधर आणि प्रा. पी. ए. साठे हे शिक्षक मार्गदर्शक म्हणून या स्पर्धेत सहभागी झाले होते. अ‍ॅस्ट्रॉनॉमी आणि अ‍ॅस्ट्रेफिजिक्समध्ये हीच भूमिका डॉ. अनिकेत सुळे, प्रा. जसजीत सिंग बागला, डॉ. मनोजेंदू चौधरी आणि प्रा. जयश्री रामदास यांनी निभावली. या स्पर्धेत ३९ देशांतून विद्यार्थी सहभागी झाले होते.