आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने यंदाही आपला ठसा उमटवला आहे. राजकोट येथील निशांत अभंगी आणि दिल्ली येथील अर्चित बुबना यांनी सुवर्ण तर इंदूर येथील ध्रुव अरोरा, सोनिपत येथील हर्षवर्धन अगरवाल आणि सुरत येथील कौस्तुभ दिघे यांनी रौप्य पदक पटकावले आहे.

पन्नासावी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड इस्राईल येथे ७ ते १४ जुलैदरम्यान झाली. लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेच्या माध्यमातून या स्पर्धेत विद्यार्थ्यांना जोखले जाते. भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने यंदाही या स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे.

होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा इन्सिटय़ूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या संस्था ऑलिम्पियाडच्या तयारीसाठी प्रमुख मार्गदर्शक संस्था म्हणून काम करतात.

भारतीय संघाचे नेतृत्व होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचे प्रा. अन्वेष मुजुमदार, पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक जे. पी. गद्रे यांनी केले. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च प्रा. अमोल दिघे आणि नागपूर येथील एस. एम. मोहता महाविद्यालयातील डॉ. विजय सोमण हे साहाय्यक होते. तीन वेगवेगळ्या चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पारख करून या संस्था भारतीय संघाची निवड करतात.  या स्पर्धेसाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या निवड परीक्षेला ४५ हजार विद्यार्थी बसले होते.