इंग्लंड येथे झालेल्या ६०व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने एक सुवर्ण आणि चार रौप्यपदके  पटकावली आहेत. तसेच हंगेरी येथे झालेल्या ३०व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने ३ रौप्यपदके मिळवली आहेत. या दोन्ही स्पर्धामध्ये भारताला प्रत्येकी एक ऑनरेबल मेन्शनसुद्धा मिळाले आहे. गणित ऑलिम्पियाडमध्ये ११२ देशांच्या ६२१ स्पर्धकांनी तर, जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ७२ देशांच्या २८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

गणित ऑलिम्पियाडमध्ये बंगळूरुच्या प्रांजल श्रीवास्तवने सुवर्णपदकाची कमाई केली. कोलकात्याचे रितम नाग, अनुभाब घोषाल, इंदौरचा भाव्य अग्रवाल आणि नवी दिल्लीचा ओजस मित्तल यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले. नवी दिल्लीच्या सौमिल अग्रवालला ‘ऑनरेबल मेन्शन’ने गौरवण्यात आले. होमी भाभा केंद्राचे माजी प्रमुख प्रा. सी. आर. प्रणेसचार, पुण्याच्या स. प. महाविद्यालयाचे प्रा. व्ही. एम. सोलापूरकर, माजी सुवर्णपदक विजेती डॉ. एन. व्ही. तेजस्वी, भारतीय सांख्यिकी संस्थेचे प्रा. आर. बी. बापट यांनी भारतीय संघाला मार्गदर्शन केले.

जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये आग्य्राचा हार्दिक गुप्ता, सुरतचा अरुनंग्शू भट्टाचार्य, बंकुराचा सूर्यदीप मंडल यांनी रौप्यपदक मिळवले. वडोदराच्या अक्षय गुप्ताला ‘ऑनरेबल मेन्शन’ने सन्मानित करण्यात आले. सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका उज्ज्वला बापट, होमी भाभा केंद्राच्या प्रा. रेखा वर्तक, आयआयटी मुंबईचे डॉ. किरण कोंडाबागिल, एनआयआरआरएच संस्थेचे डॉ. रामभादूर सुबेदी यांनी भारतीय संघाला मार्गदर्शन केले.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि टाटा मूलभूत संशोधन केंद्र या संस्था आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी भारतीय संघाची निवड करतात. जीवशास्त्राच्या संघासाठी तीन स्तरावर निवडप्रक्रिया राबवण्यात आली. देशभर १२०० केंद्रांवर घेण्यात आलेल्या जीवशास्त्राच्या परीक्षेत २७ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक निवड चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. गणिताच्या संघासाठीही याच प्रकारच्या निवडप्रक्रियेचा अवलंब करण्यात आला होता. निवड झालेल्या दोन्ही संघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करत देशाचे नाव उंचावले.