आयआयटी ‘बेटिक’च्या माध्यमातून २० उपकरणे तयार

भारतीय वैद्यक क्षेत्रास लाभदायक ठरणारी २० वैद्यकीय उपकरणे भारतीय वैद्यक क्षेत्रात दाखल होण्यासाठी तयार आहेत. आयआयटीच्या बायोमेडिकल इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर (बेटिक) विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या या उपकरणांच्या किमती आयात होत असलेल्या उपकरणांच्या तुलनेत कमी असल्याने रुग्णावरील उपचाराचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

‘बेटिक’च्या तंत्रज्ञांनी डॉक्टरांसाठी स्मार्ट स्टेथोस्कोप, मधुमेहाच्या रुग्णांसाठी डायबेटिक फूट स्क्रीनर, हाडाला मार लागल्यानंतर प्रथमोपचारामध्ये सामान्य माणसाला करता येईल अशी प्लॉस्टर पट्टी अशी २० वैद्यकीय उपकरणे तयार केली आहेत. ही उपकरणे भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी शनिवारी आयआयटीत तज्ज्ञ डॉक्टर, उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या चर्चासत्रात करण्यात आली.

‘बेटिक’ला यावर्षी पाच वर्षे पूर्ण होत असून कामाचा आढावा आणि पुढील वाटचालीचे नियोजन या उद्देशातून या चर्चासत्राचे आयोजन केले होते. तंत्रज्ञ किंवा संशोधक त्यांच्या स्तरावर संशोधनातून उपकरणाची निर्मिती करण्यापर्यंतच सीमित राहतात. मागणी, नफा आणि परदेशी बाजारपेठेशी स्पर्धा या दृष्टीने उद्योजक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतात. या दोघांमध्ये दरी आढळते. ही दरी दूर करून उद्योजकांच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेचा विचार करून उपकरणाची निर्मिती, बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या अन्य उपकरणांचा अभ्यास, उपकरणाची बाजार पेठेतील किंमत, त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा इत्यादी बाबींचा उद्योजकांच्या नजरेतून संशोधकांनीही विचार करणे आवश्यक आहे. यासाठीच प्रथमच अशा प्रकारे उद्योजक, डॉक्टर आणि तंत्रज्ञ एकत्रित जमा झाले असल्याचे बेटिकचे संस्थापक प्राध्यापक बी. रवी यांनी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

हायब्रीड प्लास्टर स्प्लिंट, स्मार्ट स्टेथोस्कोप आणि डायबेटिक फूट स्क्रीनर या तिन्ही उत्पादनांना दिल्ली येथील बीआयआरएसीच्या वतीने ५० लाख रुपयांचा ‘बायोटेक्नॉलॉजी इग्निशन ग्रॅण्ट पुरस्कार’ मिळाला असून यांचे उत्पादन, चाचणी आणि बाजार विपणनासाठी वापर केला जाणार असल्याचे ‘बेटिक’चे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी डॉ. रुपेश घ्यार यांनी सांगितले.

‘बेटिक’ची उपकरणे

  • पुण्याच्या सीओपी संस्थेच्या बेटिक विभागाने हायब्रीड प्लास्टर स्प्लिंट तयार केले आहे. अपघातामध्ये हाडाला मार लागल्यानंतर डॉक्टरकडे जाईपर्यंत तो भाग स्थिर ठेवण्यासाठी दुखावलेला भाग कपडय़ाने किंवा पट्टीच्या साहाय्याने बांधून रुग्णालयात नेण्यासाठी सामान्य माणसालाही प्लास्टर करता येईल अशी पट्टी तंत्रज्ञांनी विकसित केली आहे. ही पट्टी पाण्यात बुडवून सहज रीतीने दुखावलेल्या भागावर बांधल्यानंतर तो भाग प्लास्टर केल्याप्रमाणे काही काळ स्थिर राहतो.
  • मधुमेहाच्या रुग्णाच्या पायामधील संभाव्य संसर्ग जाणून वेळीच काळजी घेण्यासाठी डायबेटिक फूट स्क्रीनर यासह भारतीय बनावटीचे स्टेंट, त्वचेच्या विकारांचे निदान करण्यासाठी विविध पद्धतीने फोटो घेणारे उपकरण, भारतीय बनावटीचे बायोप्सी यंत्र, पोर्टेबल शस्त्रक्रियागृह.

भारतीय वैद्यक क्षेत्रात ७८ टक्के उपकरणे आयात केली जातात. भारतीय तंत्रज्ञानाद्वारे विकसित केलेल्या या उपकरणांच्या किमती तुलनेने कमी असल्याने रुग्णावरील उपचाराचा भार नक्कीच कमी होईल. आता आम्ही उद्योजक आणि गुंतवणूकदाराच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल होण्याची तयारी करत आहोत. पुढील पाच वर्षांत बेटिकची उपकरणे नक्कीच भारतीय वैद्यक क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करतील.   – प्राध्यापक बी. रवी, बेटिकचे संस्थापक