सुहास जोशी

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सहली रद्द होण्याबरोबरच, येणाऱ्या सुट्टय़ांच्या मोसमातील अनिश्चितता पाहता आग्नेय अशियाई देशातील पर्यटनाबाबत भारतीय पर्यटकांमध्ये साशंकता दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटकांचा कल देशांतर्गत पर्यटनाकडे ३० टक्क्य़ांनी वाढल्याचे पर्यटन कंपन्यांचे म्हणणे आहे.

महिनाभरापासून पर्यटक कंपन्यांनी चीनमध्ये जाणाऱ्या सर्वच सहली रद्द केल्या आहेत. त्यामुळे जपान आणि चीनमधील चेरी ब्लॉसमच्या पार्श्वभूमीवर मार्चमधील पर्यटनाला फटका बसला. जपान आणि चीन, कोरिया आणि चीन अशा संयुक्त पर्यटनाच्या नियोजित टूर्स रद्द झाल्या. त्या बदल्यात पर्यटकांनी युरोप, अमेरिका आणि दक्षिण अफ्रिकी देशांना पसंती दर्शवल्याचे पर्यटन कंपन्यांतर्फे सांगण्यात आले. काहीनी देशांतर्गत पर्यटनाचा पर्याय चोखाळला आहे.

केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ म्हणाल्या की, चीनच्या मार्चमधील सर्व टूर्स रद्द केल्या असून पुढील काळातील अनिश्चितता कायम आहे. आग्नेय अशियातील देशांबाबतच्या भीतीमुळे देशांतर्गत पर्यटनाला ३० ते ४० टक्क्य़ांनी प्रतिसाद वाढल्याचे त्यांनी नमूद केले. सिक्कीम, दार्जिलिंग, हिमाचल, ईशान्य भारत याकडे पर्यटकांचा ओढा दिसत आहे.

करोनाचे रुग्ण आग्नेय अशियाई देशांमध्ये आढळल्यानंतरअनेकांनी पर्यटन कंपन्यांच्या कार्यालयात याबद्दल विचारणा केल्याची माहिती मिळते, तर काहींनी नोंदणी रद्द केली. मात्र एखाद्या देशाकडून अधिकृतपणे पर्यटनाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात नाहीत, तोपर्यंत पर्यटन कंपन्यांकडून या देशांतील टूर्स रद्द करण्याचा निर्णय घेतला जात नसल्याचे पर्यटन कंपन्या सांगतात.

खूप आधीपासून नियोजन करणाऱ्या पर्यटकांकडून, विशेषत: शालेय सुट्टय़ांच्या अनुषंगाने होणाऱ्या पर्यटनासाठी सध्या इतर पर्याय स्वीकारले जात आहेत. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनाच्या योजना अचानक वर येताना दिसत आहेत. काहीजणांनी हिवाळ्यातील पर्यटनाकडे मोर्चा वळवल्याचे इशा टूर्सचे आत्माराम परब यांनी सांगितले.

करोनाच्या साथीमुळे आग्नेय अशियाई देशांबाबत पर्यटक साशंक असून या देशांसाठी येणाऱ्या काळातील पर्यटनासाठी आगाऊ नोंदणीचा वेग साधारण ३० टक्क्य़ांनी कमी झाला आहे. मात्र आग्नेय अशियाई देशांतील पर्यटनावर होणारा परिणाम दीर्घकाळ न टिकता लगेचच त्यात वाढ होऊ शकते. सध्या आखलेल्या आग्नेय अशियाई देशांतील पूर्वनियोजित टूर्सना कोणताही अडथळा नसून त्या सुरळीत सुरू आहेत. चीनचे पर्यटन दौरे अनिश्चित काळ पुढे ढकलले आहेत.

– वीणा पाटील, वीणा वर्ल्ड