मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी भारतानेही अल्फा फोटोमीटर, मिथेन सेन्सर अशा आधुनिक तंत्रज्ञानासह उपग्रह बांधणीचा प्रकल्प सुरू केला असून या उपग्रहाचे प्रक्षेपण या वर्षी २२ ऑक्टोबरला करण्यात येणार असल्याची माहिती अहमदाबाद येथील ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’तील (इस्रो) ‘स्पेस अ‍ॅप्लीकेशन सेंटर’चे समूह संचालक डॉ. नीलेश देसाई यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाच्या दर शनिवारी आयोजिल्या जाणाऱ्या ‘आईज’ या व्याख्यानमालेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ‘प्रक्षेपण झाल्यानंतर साधारणपणे २९४ दिवसांनी म्हणजे २२ सप्टेंबर, २०१४ ला भारताचा उपग्रह मंगळाच्या कक्षेत पोहोचेल. या महत्त्वाकांक्षी मोहिमेमुळे भारताचे अवकाश क्षेत्रात असलेले स्थान आणखी उंचावेल,’ असा विश्वास डॉ. देसाई यांनी व्यक्त केला.
भारताच्या मंगळ प्रक्षेपण मोहिमेबरोबरच दुसऱ्या ‘चांद्रयान’ मोहिमेची माहितीही त्यांनी दिली. भारताने २००८ मध्ये २२ ऑक्टोबरलाच ‘चांद्रयान-१’ ही मोहीम यशस्वी केली होती. या मोहिमेनंतर चंद्रावरील पाण्याचा शोध, तसेच जीवसृष्टी व खनिजसंपत्ती यांच्या शोधासाठी भारताने दुसरी महत्त्वाची योजना हाती घेतली आहे, असे डॉ. देसाई यांनी सांगितले. या मोहिमेदरम्यान चंद्रावर उतरणारे यान, त्यांचे लॅन्डर आणि उतरल्यानंतर तेथील सर्व गोष्टींचा शोध घेणारे रोव्हर या विषयी त्यांनी माहिती दिली.
‘भारताची अवकाश दृष्टी – समाज, विज्ञान व सुरक्षेसाठी उपयुक्त तंत्रज्ञान’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ‘डॉ. विक्रम साराबाई यांनी भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे तंत्रज्ञान समाजाच्या उपयोगासाठी असावे असा विचार मांडला. या विचारावरच ‘इस्रो’ने गेल्या २५ वर्षांत अवकाश संशोधनाचे व उपग्रह विकासाचे कार्यक्रम आखले आहेत. या काळात ‘इस्रो’ने अवकाशात प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांचा उपयोग कृषी, वन, आपत्ती व्यवस्थापन, भूकंप, पूर, भूगर्भ, तसेच हिमालयातील ग्लेशियर समुद्रातील जहाजांना वाऱ्याचा वेग व दिशादर्शन अशा अनेक कामात झाला,’ अशा शब्दांत त्यांनी ‘इस्रो’च्या कार्याचे महत्त्व स्पष्ट केले. ऑप्टीकल व मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सींग, रडार इमेजिंग सॅटेलाईट, उपग्रह व विमानाला लागणाऱ्या संदेशाची देवाण-घेवाण याबद्दल डॉ. देसाई यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
‘रिमोट सेन्सींग उपग्रह क्षेत्रात भारत १९७८पासून आहे. भारत सध्या वर्षांला दोन ते चार रिमोट सेन्सींग उपग्रह अवकाशात सोडतो. यामुळे पृथ्वीवरील एक मीटरवरील प्रतिमादेखील स्पष्टपणे दिसते. तसेच रडार इमेजिंग तंत्रज्ञानाच्या ओशनसॅटमुळे समुद्रातील जहाजांना वाऱ्याचा वेग व दिशाची माहिती मिळण्यात मदत झाली,’ असे त्यांनी रिमोट सेन्सींग उपग्रह क्षेत्रातील भारताच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले. व्याख्यानानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला.