वाहतूकविषयक गुन्ह्य़ांना आळा बसावा यासाठी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने दंडात जबर वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित असून त्यापाठोपाठ आता राज्याच्या परिवहन विभागाला नव्या गुणांकन पद्धतीचा प्रस्ताव पाठविला आहे. ही पद्धत अशी आहे की, गुन्हेगार चालकाचे गुणांकन जसे वाढेल तशी त्याच्यावरील कारवाई वाढणार आहे. अगदी त्याचा परवाना आणि प्रसंगी परमीटही रद्द होणार आहे. हा प्रस्ताव दीड महिन्यांपासून शासन दरबारी पडून आहे.
बऱ्याचवेळा वाहन चालकाकडून झेब्रा क्राँसिंगवर गाडी उभी करणे, सिग्नल तोडणे, मार्गिका बदलणे, विनाकारण हॉर्न वाजविणे आदी अनेक गुन्हे केले जातात. या गुन्ह्य़ांप्रकरणी दंड करण्याबरोबरच गुणांकन देण्याचा प्रस्ताव सहआयुक्त विवेक फणसाळकर यांनी परिवहन विभागाला पाठविला आहे. या प्रस्तावानुसार गुन्हेगार चालकाच्या परवान्यावर त्याच्या गुणांची नोंद होणार आहे. हे गुण दहा इतके झाल्यावर चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. त्यापेक्षा अधिक गुण झाले तर चालक परवाना कायमचा रद्द होऊ शकणार आहे. हा प्रस्ताव दीड महिन्यांपूर्वी राज्याच्या परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. ही गुणांकन पद्धत राबविण्याबाबत परिवहन विभागाकडे परवान्यांचा संपूर्ण तपशील आहे. या तपशीलाची वाहतूक पोलिसांच्या माहितीशी जुळवाजुळव झाल्यानंतरच ही पद्धत राबविता येणार आहे. गुणांकन प्रस्तावामुळे वाहतूकविषयक गुन्हे कमी होतील, अशी अपेक्षा आहे. परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांना हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या संदर्भात लवकरच बैठक अपेक्षित असल्याचे सहआयुक्त फणसाळकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

नेमका प्रस्ताव काय?
मोटर वाहन कायद्यातील १७७ कलमानुसार, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल तोडणे, मार्गिका बदलणे, विचित्र नंबर प्लेट आदी गुन्हा केल्यावर चालकाच्या खात्यात एका गुणाची भर होईल. वेगाने वाहन चालविल्यास कलम १८३ नुसार गुन्हा होतो. त्यासाठी तीन गुण दिले जातील. धोकादायकरीत्या वाहन चालविल्याबद्दल पाच, तर मद्यपान करून वाहन चालविताना पकडला गेल्यास दंड आणि कारावास या सोबत दहा गुणांची चालकाच्या खात्यात भर पडेल.