निकालासाठी सलमानला न्यायालयाने बोलावले आहे हे वृत्त उच्च न्यायालयाच्या इमारतीत वाऱ्यासारखे पसरले आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेले न्यायालय क्रमांक ४३ वकीलवर्ग आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी भरून गेले. न्यायालयात एवढी गर्दी होती की प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही उभे राहण्यास जागा नव्हती. वकिलांना आणि कर्मचारीवर्गाला बाहेर काढता येत नसल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना अशक्य होऊन बसले होते. न्यायालयातच नव्हे, तर न्यायालयाच्या बाहेरही सगळेजण मोबाइलमध्ये सलमानला ‘कैद’ करण्यासाठी जमा झाले होते. न्यायालयात सुनावणीसाठी आलेले सर्वसामान्यही न्यायालय क्रमांक ४३ कडे वळत होते. न्यायालयातील वकीलवर्ग एकीकडे त्याचे मोबाइलद्वारे छायाचित्र घेण्यास धडपडत होते, तर तरुण महिला वकिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. एरव्ही न्यायालयात मोबाइल वापरण्यावर बंदी आहे. छायाचित्र काढणे तर दूरची गोष्ट. परंतु दुसऱ्यांना सल्ला देणाऱ्या वकीलवर्ग व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाच त्याचा विसर पडल्याचे चित्र होते.

निकालाच्या वेळी सलमान हजर राहू शकतो का, अशी विचारणा न्यायालयाने त्याच्या वकिलांकडे केली. परंतु न्यायालयाच्या विचारणेमुळे सलमानच्या वकिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकून गेली. सलमानला बोलावण्यामागील कारणाची चाचपणी त्यांच्याकडून केली गेली. परंतु कायद्यातील दुरुस्ती म्हणून त्याला बोलावण्यात येण्याचे आणि सर्वोच्च न्यायालयातील अपिलाच्या तयारीची गरज नसल्याचे सांगण्यात आल्यावर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तसेच सलमान दुपारी दीडपर्यंत न्यायालयासमोर हजर होईल, असे आश्वासन दिले. सलमान कर्जत येथील चित्रीकरण अर्धवट सोडून दुपारी दीडच्या सुमारास न्यायालयात पोहोचला.

त्या बाबींचा ऊहापोह होणे गरजेचे होते
निकालाची प्रतीची वाट पाहत आहोत. त्यात नेमके काय म्हटले आहे याचा अभ्यास करून पुढे काय याबाबतचा अभिप्राय राज्य सरकारला दिला जाईल. परंतु न्यायालयाने बऱ्याच गोष्टींचा ऊहापोह करणे गरजेचे होते. त्यात नुरुल्ला याचा मृत्यू अपघातात गाडीखाली चिरडून नव्हे, तर अपघातग्रस्त गाडी क्रेनद्वारे उचलताना पुन्हा पडल्याने त्याखाली सापडून झाला हा सलमानच्या दाव्याचा प्रामुख्याने समावेश आहे. अशोक सिंगने गाडी चालवली, तर सलमान हा दावा कसा काय करू शकतो. दुसरे म्हणजे १३ वर्षांनंतर अशोक सिंगने न्यायालयासमोर येऊन आपण गाडी चालवल्याचा दावा करणे आणि त्याचा आरोप स्वत:च्या माथी घेणे तसेच त्याला नोकरीवरही ठेवणे अनाकलनीय आहे. या सगळ्याचा विचार झालेला दिसत नाही. परंतु तांत्रिक मुद्दय़ांवर भर दिलेला दिसतो.
– संदीप शिंदे, मुख्य सरकारी वकील

निकालाबाबत समाधानी
लहानसहान गोष्टींवर सुनावणी केली. कायद्यातील तरतुदी आणि वस्तुस्थिती पाहून न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. न्याय मिळाल्याचा आनंद आहे. निकालाबाबत समाधानी आहोत.
– अ‍ॅड. अमित देसाई