शांतता क्षेत्र निश्चित करण्याच्या कामास खीळ

मुंबई : मुंबईत दिवाळी, गोकुळाष्टमी, रमजान, गणेशोत्सव आदी सणासुदीच्या काळातील ध्वनी प्रदूषण कमी झाले असले तरी रस्त्यांवरील बेशिस्त वाहतूक, रेल्वे यामुळे ध्वनी प्रदूषणाची पातळी चढीच राहिली आहे. शहरात शांतता क्षेत्र निश्चित करण्याच्या कामालाही खीळ बसली आहे.

ध्वनी प्रदूषणाबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखलेल्या नियमांनुसार रहिवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा दिवसा ५५ डेसिबल (डीबी) आणि रात्री ४५ (डीबी) पेक्षा जास्त नसावी. शांतता क्षेत्रात ही मर्यादा दिवसा ५० डीबी आणि रात्री ४० डीबी असणे बंधनकारक आहे, तर औद्योगिक क्षेत्रांत दिवसा ७५ डीबी, रात्री ७० डीबी आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये दिवसा ६५ डीबी, रात्री ५५ डीबी बंधनकारक आहे. मात्र मुंबईत ही मर्यादा बिनदिक्कत ओलांडली जाते. सणासुदीच्या काळात फटाके, ध्वनिक्षेपकांमुळे आवाजाच्या सर्वसाधारण पातळीत वाढ होते. याविषयी गेली काही वर्षे प्रबोधन करण्यात आल्यामुळे यंदाच्या दिवाळी, गोकुळाष्टमी, रमजान या सणांच्या काळात ध्वनी प्रदूषणात घट झाली; परंतु वाहतुकीमुळे होणारे ध्वनी प्रदूषण वाढल्याने मर्यादांचे उल्लंघन होत आहे. नीरीने तयार केलेल्या अहवालात ही बाब अधोरेखित झाली आहे. या अहवालानुसार शांतता क्षेत्रात दिवसा आवाजाची पातळी ७८.८ डीबी आणि रात्री ७१.१ डीबी नोंदविण्यात आली. म्हणजेच विहित मर्यादेपेक्षा ही पातळी दिवसा २८.८ डीबी आणि रात्री २१.१ डीबीने अधिक आहे.

दुसरीकडे मुंबईत शांतता क्षेत्र निश्चित करण्याचे कामही ठप्प झाले आहे. मुंबईत २०१७ पर्यंत १५०० शांतता क्षेत्रे होती. नव्या नियमांनुसार ही सर्व क्षेत्रे बाद ठरली आहेत. आता राज्य सरकारला पालिका प्रशासनाच्या मदतीने शांतता क्षेत्रे निश्चित करायची आहेत. पालिकेने त्यानुसार २०१८ मध्ये पहिल्या टप्प्यात ११० शांतता क्षेत्रांची यादी जाहीर केली. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, धार्मिक स्थळे इत्यादी परिसर शांतता क्षेत्र म्हणून निश्चित केले जातात. ध्वनी प्रदूषणावर जाणीवजागृतीचे काम करणाऱ्या ‘आवाज फाऊंडेशन’ने महत्त्वाच्या ४० क्षेत्रांची यादी पालिका आणि राज्य सरकारला पाठवली होती. मात्र अजूनही शांतता क्षेत्रांच्या यादीत महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला नाही.

निवासी क्षेत्रात ध्वनी प्रदूषण

नीरीच्या अहवालामध्ये निवासी क्षेत्रात आवाजाची पातळी दिवसा ८५.१ डीबी आणि रात्री ८०.७ डीबी नमूद करण्यात आली आहे. म्हणजेच विहित मर्यादेपेक्षा ही पातळी अधिकच आहे.

रेल्वे-रस्ते वाहतुकीमुळे ध्वनी प्रदूषण

गेल्या वर्षीच्या नीरीच्या अहवालानुसार कामांच्या दिवसांमध्ये आवाजाची पातळी रेल्वेमुळे दिवसा ८९ डीबी आणि रात्री ७९.६ डीबी राहते. स्थानकांतील उद्घोषणांमुळे आजूबाजूच्या परिसरांत राहणाऱ्या रहिवाशांना सतत ध्वनी प्रदूषणाला तोंड द्यावे लागते. मुख्य रस्त्यांवरील आवाजाची पातळी दिवसा ८८.७ डीबी, तर रात्री ८२.१ डीबी इतकी असते. महामार्गावर दिवसा ८५ डीबी आणि रात्री ७८ डीबी आवाज असतो. हे ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन आहे.

मुंबईच्या शांतता क्षेत्रांमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. मात्र पालिकेच्या उदासीनतेमुळे शांतता क्षेत्रात वाढ होत नसून त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. शिवाय मेट्रोचे बांधकाम, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सामान्य दिवसांमध्ये ध्वनी प्रदूषणात भर घालते आहे.

– सुमेरा अब्दुलली, संचालक, आवाज फाऊंडेशन