मुंबईतील ‘रशियन विज्ञान आणि सांस्कृतिक केंद्रा’चा ४० वा वर्धापनदिन आणि मुंबईतून सुरू झालेल्या रशियाच्या पहिल्या राजनैतिक मिशनला यंदा ११५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त रशियन दूतावास, रशियन विज्ञान आणि सांस्कृतिक केंद्र आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १७ डिसेंबरदरम्यान इंडो-रशियन चित्रपट महोत्सवाचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील पेडर रोडवरील रशियन विज्ञान आणि सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात शनिवारी १२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध रशियन चित्रपट निर्माते याकोव कालेर, सुप्रसिद्ध कलाकार रणधीर कपूर, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक किरण शांताराम हे उपस्थित राहणार आहेत.
यासंदर्भात रशियन विज्ञान आणि सांस्कृतिक केंद्राचे संचालक व्लादिमिर दिमिन्तीयेव यांनी सांगितले की, आपल्या दोन देशांतील संबंध अनेक शतकांचे असले तरीही, दोन देशांतील नागरिकांना चित्रपटाने अधिक जवळ आणले आहे. या चित्रपट महोत्सवात भारत आणि रशिया या दोन्ही देशांत गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपट महोत्सवामुळे भारत-रशिया मैत्री संबंधातील पटच नवीन पिढीतील कलाकार, सिनेरसिकांसमोर उलगडला जाणार आहे.
याप्रसंगी राज कपूरचा ‘आवारा’, याकोव क्रेझर, फॉरगोटन जनरल, किसिलेसव्हज लिस्ट, अ स्लेव्ह ऑफ लव्ह, कल आज और कल, डॉक्टर कोटणीस की अमर कहानी, जर्नी बियाँड थ्री सीस (परदेसी), द डायमंड आम्र्स, मेरा नाम जोकर आदी चित्रपट, माहितीपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट विनामूल्य असून, अधिक माहितीसाठी आणि प्रवेशिकेसाठी रशियन सेंटर फॉर सायन्स अ‍ॅड कल्चर, पेडर रोड मंबई- ४०००२६ येथे प्रत्यक्ष अथवा २३५१२४९५/२३५१०७९३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.