शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्या अचानक बेशुद्धावस्थेत जाण्याबाबत आतापर्यंत वर्तवण्यात येणारे औषधाचे अतिसेवन किंवा आत्महत्येचा प्रयत्न, असे सर्व अंदाज धुडकावणारा अहवाल तुरुंगाच्या पोलीस महानिरीक्षकांनी सादर केल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.
इंद्राणीने औषधांचे अतिसेवन केले नव्हते, तसेच तिने विषही प्राशन केले नव्हते. उलट तिने औषधे घेणेच बंद केले होते. म्हणूनच तिला अशक्तपणा आला असावा. इतकेच नव्हे तर ती आधीही अशा पद्धतीने वरचेवर बेशुद्ध होत असे, असे तुरुंग पोलीस निरीक्षक बिपीन कुमार सिंग यांनी स्पष्ट केले. इंद्राणीवर आपल्या मुलीच्याच हत्येचा आरोप आहे. ‘आम्ही सर्व बाजूंनी चौकशी केली असून तिच्या बेशुद्ध होण्यात कोणताही कट वा घातपात नाही. तसेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही पुरावा नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. आदल्या दिवशी इंद्राणीचे समुपदेशन करण्यात आल्यानंतर तिला तिच्या आईच्या मृत्यूचे वृत्त देण्यात आले होते. त्यावेळी तिचे वकीलही उपस्थित होते, अशी माहितीही त्यांनी पुरविली. इंद्राणीच्या लघवीत सापडलेला गुंगीच्या औषधाचा अंश अत्यंत कमी होता. दरम्यान सीबीआयच्या दोघा अधिकाऱ्यांनी शनिवारी इंद्राणीची तब्बल सहा तास कसून चौकशीही केली.