शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि तिची आई इंद्राणी मुखर्जीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य दोन आरोपी संजीव खन्ना आणि श्यामवर राय या दोघांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

भायखळा कारागृहात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला अत्यवस्थ वाटू लागल्याने तिला शुक्रवारी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार डॉक्टरांचे विशेष पथक तिच्यावर उपचार करत आहेत. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. लहाने यांनी सांगितले. रुग्णालयातून सोडल्यानंतर तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञांच्या उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामवर राय यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्यांना व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १९ ऑक्टोबपर्यंत वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ते दोघे सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.