शीना बोरा हत्याकांडप्रकरणातील प्रमुख आरोपी असणारी इंद्राणी मुखर्जी सध्या भायखळा येथील तुरुंगात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून इंद्राणीच्या एका विचित्र सवयीमुळे तेथील पोलीस अधिकारी गोंधळले आहेत. इंद्राणीने आपल्या कोठडीमध्ये पाण्याच्या २० लिटरच्या मोठ्या बाटल्या साठवत आहे. तिने आत्तापर्यंत २० मोठ्या पाण्याच्या बाटल्या तुरुंगातील कॅनटीनमधून विकत घेतल्या असून त्या आपल्या कोठडीमध्ये ठेवल्या आहेत. म्हणजेच तिच्या कोठडीमध्ये एकूण ४०० लिटर पाणी आहे. पण ती असं का करत आहेत याचा शोध पोलिस घेत आहेत.

मागील काही महिन्यापासून इंद्राणी दर आठवड्याला तुरुंगातील कॅन्टीनमधून एक पाण्याची मोठी बाटली विकत घेते. तिने या सर्व बाटल्या आपल्या कोठडीमध्ये रांगेत उभ्या करुन ठेवल्या आहेत. याबद्दल पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने ‘मला त्या हव्या आहेत,’ इतकचं उत्तर दिलं आहे. या २० लिटरच्या एका बाटलीची किंमत १२० रुपये इतकी आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार इंद्राणीला दर महिन्याला तुरुंगामध्ये चार हजार रुपयांची मनी ऑर्डर येते. यामधील पैसे ती पाण्याच्या बाटल्या विकत घेण्यासाठीच खर्च करते असं तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. इंद्राणी ही बड्या प्रकरणामधील महत्वाची गुन्हेगार असल्याने तिला स्वतंत्र कोठडी देण्यात आली आहे. तिच्या कोठडीमध्ये दुसरी कोणतीही महिला कैदी नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिने अशाप्रकारे पाण्याच्या बाटल्या गोळा करण्याने तिच्या सुरक्षेला काहीही धोका नसल्याचे मत तरुंग अधिकाऱ्यांनी दिली आहे.

१५ नोव्हेंबर रोजी न्यायलयामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान इंद्राणीच्या वकिलाने तिला न बरा होण्यासारखा आजार झाला आहे असं म्हटलं होतं. मात्र हा आजार काय आहे हे त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं. सहा महिन्यापूर्वी इंद्राणीने सीबीआयच्या विशेष न्यायलयामध्ये प्रकृतीच्या कारणाने जामीन देण्यात यावा असा अर्ज केला होता. “इंद्राणीची प्रकृती दिवसोंदिवस खालावत चालली आहे,” असं तिचे वकील तन्वीर अहमद यांनी न्यायालयासमोर सांगितले होते. तिचा आजार बरा करण्यासाठी खास डॉक्टरांच्या उपचारांची गरज असून ते उपचार तुरुंगामध्ये मिळणार नाहीत असा युक्तीवाद अहमद यांनी नोव्हेंबर २०१८ साली जामीन अर्ज न्यायलयासमोर सादर करताना केला होता. मात्र जामीन दिल्यास या प्रकरणाच्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे असं सीबीआयने न्यायालयात सांगितले होते. न्यायालयाने इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळला होता. २४ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणीने कारमध्ये स्वत:च्या मुलीचा म्हणजेच शीना बोराचा गळा दाबून हत्या केली असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.