शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीची भायखळा तुरुंगात बडदास्त ठेवली जात असून तिला फेशियल आणि मसाजसारखी सुविधा मिळत असल्याची शंका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केली. तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण गाजत असताना शेलार यांनी इंद्राणीला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ मिळत असल्याची शंका विधानसभेत उपस्थित करून खळबळ उडवून दिली. त्यावर अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा इंद्राणीला दिल्या जात नसल्याचं तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिलं.

भायखळा तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. या चर्चेत आमदार शेलार यांनी सहभाग घेतला होता. इंद्राणी तुरुंगात मसाज, फेशियल, पेडिक्युअर यांसारख्या सुविधा घेत होती. तिला मंजुळा शेट्ये मदत करत होती. त्यासाठी मंजुळा शेट्येकडून मदत घेतली जात होती, अशी चर्चा ऐकायला मिळत असल्याचं शेलार यांनी सांगितलं. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शेलार यांनी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले. मंजुळा शेट्येच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या, असा खोटा अहवाल देणाऱ्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही शेलार यांनी केली होती. त्यावर संबंधित डॉक्टरची चौकशी करण्यात येईल, तसेच इंद्राणीला अशा कोणत्या सुविधा मिळत होत्या का? त्यात मंजुळा शेट्येचा सहभाग होता का, याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासनही पाटील यांनी दिले.

दरम्यान, तुरुंगातील सर्व कैद्यांना समान वागणूक दिली जाते. खूनातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला अशा प्रकारच्या विशेष सुविधा का पुरवू, असा सवाल कारागृह प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. अशी कोणत्याही प्रकारची सुविधा इंद्राणीला दिली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, इंद्राणीला सुविधा मिळत असल्याचा आरोप आणि त्यात मंजुळा शेट्येचा काही सहभाग होता का, या बाबींची चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीनं गृहराज्यमंत्री पाटील यांनी दिली.