शीना बोरा हत्येच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेली तिची आई इंद्राणी मुखर्जीच्या प्रकृतीत सुधारण होत असल्याची माहिती शनिवारी डॉक्टरांकडून देण्यात आली. काल दुपारी इंद्राणी मुखर्जी ही कारागृहात बेशुद्धावस्थेत सापडली होती. त्यानंतर तिला उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, आता ती शुद्धीवर आली असून डॉक्टरांच्या सुचनांना प्रतिसाद देत आहे. परंतु, ती अजूनही ग्लानीच्या अवस्थेत असून तिचा श्वासोच्छश्वासही पूर्ववत झाला नसल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. इंद्राणी मुखर्जीने तणावावरील गोळ्यांचे अतिसेवन केल्याने त्यांना शुक्रवारी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली होती.
इंद्राणीला बेशुद्धावस्थेतच रुग्णालयात आणल्यानंतर २४ तासांमध्ये तिच्या प्रकृतीत सुधारणा होणे अपेक्षित होते. इंद्राणीला न्यायालयीन कोठडी मिळाली असून ती भायखळा कारागृहात आहे. अस्वस्थता वाटत असल्याची तक्रार करण्यात आल्यावर तिला शुक्रवारी दुपारी जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते. इंद्राणी दररोज सकाळी आणि सायंकाळी एक एक गोळी घेते. त्या वेळी तिच्यावर नजर ठेवली जाते. त्यामुळे तिच्यावर नजर ठेवणाऱ्या अधिकाऱ्याकडून त्याबाबतचा अहवाल मागवण्यात आला असून त्यानंतरच नेमके काय झाले हे सांगता येईल, असे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. वैद्यकीय अहवालानंतरच इंद्राणीला नक्की काय झाले हे स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 3, 2015 11:45 am