इंद्राणी मुखर्जीनं तिच्या मुलीची गळा दाबून हत्या केली त्यानंतर इंद्राणी शीना बोराच्या चेहऱ्यावर बसली आणि म्हटली, ‘घे तुझा थ्री बीएचके फ्लॅट’ एवढंच नाही तर शीनाचा मृतदेह इंद्राणीनं व्यवस्थित ठेवला आणि जाळला असा आरोप या प्रकरणातला माफीचा साक्षीदार आणि इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय यानं सीबीआय कोर्टात केला आहे.

इंद्राणीचा दुसरा नवरा संजीव खन्ना, इंद्राणी मुखर्जी आणि तिचा आत्ताचा नवरा पीटर मुखर्जी हे सगळे शीना बोरा हत्या प्रकरणी तुरूंगात आहेत. या प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करण्यात येते आहे. २०१२ मध्ये शीनाचा खून एका कारमध्ये करण्यात आला होता. त्यावेळी कारचा ड्रायव्हर श्यामवर राय, इंद्राणीचा दुसरा नवरा संजीव खन्ना आणि इंद्राणी कारमध्ये हजर होते. इंद्राणीनं शीनाचा गळा दाबला, संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांनीही  या हत्येत सहभाग घेतला आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला.

हे सगळं प्रकरण २०१५ मध्ये उघडकीस आलं होतं. आता ड्रायव्हर श्यामवर राय याची साक्ष सीबीआय कोर्टात सुरू आहे ज्या दरम्यान त्यानं इंद्राणीवर शीनाच्या अंगावर बसल्याचा आणि तिच्या मृतदेहाला आग लावल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. ‘एनडीटीव्ही’नं दिलेल्या बातमीनुसार, इंद्राणीने शीनाला मद्यातून ड्रग्ज दिलं होतं, ज्याचा डोस जास्त झाल्यानं शीना बोरा मागच्या सीटवर डोळे मिटून बसली होती.

जेव्हा मी शीनाचं तोंड दाबलं तेव्हा तिने माझ्या अंगठ्याचा चावा घेतला, मात्र इंद्राणी मॅडमनी तिचा गळा दाबला होता, तो सोडलाच नाही. शीनाच्या तोंडून विचित्र आवाज आले, ती ओरडण्याचा आणि श्वास घ्यायचा प्रयत्न करत होती असंही श्यामवर रायनं आपल्या साक्षीत स्पष्ट केलं आहे.

थोडा वेळ गेल्यानंतर मात्र शीनाचा आवाज येईनासा झाला, तिनं प्राण सोडला होता. त्यानंतर आम्ही पेट्रोल घेण्यासाठी गेलो त्याआधी इंद्राणीने शीनाचे केस व्यवस्थित बांधले आणि तिच्या ओठाला लिपस्टीक लावली. शीना मेली आहे याचा संशय कोणालाही येऊ नये म्हणून इंद्राणीनं ही खबरदारी घेतली.

त्यानंतर आम्ही जंगलात गेलो, तिथे तिचा मृतदेह इंद्राणीने जाळला आणि पुरला, त्यानंतर एका कॉफी शॉपमध्ये आम्ही कॉफी प्यायलो, इंद्राणीनं मला शांत बसायची धमकी तिकडेच दिली असंही श्यामवर रायनं सांगितलं आहे.

इंद्राणीनं तिचा मुलगा मिखाईल बोरा याच्याही हत्येचा कट रचला होता तसंच शीनाचा खून केल्यानंतर शीना बोरा अमेरिकेत आहे असंही भासवलं होतं, त्यासाठी तिनं मिरखाईलची मदत घेतली होती. मिखाईल अडचणीचा ठरू शकतो हे लक्षात आल्यावर त्याचा काटा काढायचा कटही तिनं रचला होता असंही ड्रायव्हर श्यामवर राय यानं सांगितलं होतं.

काय आहे संपूर्ण प्रकरण

एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराची हत्या करण्यात आली, इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा दुसरा नवरा संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय हे या हत्येत सहभागी होते

शीना बोरा ही इंद्राणीला पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती

ऑगस्ट २०१५ मध्ये मुंबईपासून ८० कि.मी. अंतरावर रायगडच्या जंगलात शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले

ड्रायव्हर श्यामवर रायला अटक झाल्यानंतर त्यानं हे सगळं प्रकरण बाहेर आलं, त्याच्या कबुलीनंतरच इंद्राणीला अटक करण्यात आली

इंद्राणी तिचा दुसरा नवरा संजीव खन्ना आणि आत्ताचा पती पीटर मुखर्जी यांनाही अटक झाली

इंद्राणीच्या रक्ताचे नमुने शीनाच्या हाडांशी जुळले

पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल मुखर्जी आणि शीना बोरा यांचे प्रेमसंबंध होते आणि ते इंद्राणीला पसंत नव्हतं

तसंच इंद्राणी आणि शीना बोरा यांच्यात संपत्तीवरूनही वाद निर्माण झाले होते, त्यातूनच तिची हत्या करण्यात आली