गोळ्यांच्या अतिसेवनाने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेली शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी  इंद्राणी मुखर्जी हिच्या जिवाला अद्यापही धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  सध्या  तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून पुढील ४८ तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. इंद्राणी हिला कोठडीत गोळ्या कशा मिळाल्या, याची चौकशी करण्यात येत असून  रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

शुक्रवारी इंद्राणी हिने ताणतणावावरील  गोळ्यांचे अतिसेवन केल्याने ती बेशुद्धावस्थेत आढळली होती. त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंद्राणी हिच्यावर अतिदक्षता विभागात चार डॉक्टरांचे पथक उपचार करीत आहेत. दरम्यान, तिच्या पोटात कुठल्याही औषधाची मात्रा सापडली नाही; परंतु तिचे रक्त आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. रविवार संध्याकाळपर्यंत त्याचा तपासणी अहवाल अपेक्षित असल्याचे जे. जे.  रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. भायखळा कारागृहात इंद्राणी काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त दिसत होती.  मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याने तिला या तणावाच्या गोळ्या दिल्या जात होत्या. तसा अहवाल कारागृह प्रशासनाने सादर केला आहे; पण इंद्राणीकडे अतिरिक्त गोळ्यांचा डोस कसा आला याची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर सीबीआयचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.