शीना बोरा हत्या प्रकरणात गेल्या आठवडाभर पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीने अखेर शीना बोरा हिच्या हत्येत सामील असल्याचा आपला गुन्हा कबूल केला आहे. तिच्या कबुलीजबाबामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शीना बोरा हत्या प्रकरणात खार पोलिसांनी तिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहन चालक श्यामवर राय यांना अटक केली होती. संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांनी यापूर्वीच आपला गुन्हा कबूल केला होता. परंतु मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी चौकशीत सहकार्य करत नव्हती. अनेकदा ती विसंगत माहिती देत पोलिसांची दिशाभूल करत होती. अगदी तिने शीना जिवंत असून अमेरिकेत पतीसोबत स्थायिक झाल्याचा अजब दावाही केला होता.
खुद्द पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी चौकशी करूनही ती गुन्हा कबूल करत नव्हती. परंतु पोलिसांच्या प्रयत्नांना मंगळवारी यश आले. इंद्राणीने अखेर आपला गुन्हा कबूल केला असून शीनाचा हत्येचा कट रचणे, हत्येत सहभाग घेणे, पुरावा नष्ट करणे आदींची कबुली दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. खटल्यासाठी हा कबुलीजबाब अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

इंद्राणीचा आणखी एक बनाव
इंद्राणी वरळीच्या मार्लो इमारतीत रहात होती. मात्र निवडणूक आयोगाला तिने दिलेल्या पत्त्यात मार्लो नोकर वसाहत असा उल्लेख आहे. नोकराच्या वसाहतीत राहत असल्याचे तिने भासवले होते. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी तिने हा बनाव केला असण्याची शक्यता एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली.

बॅगेऐवजी गाडीत मृतदेह
’शीना आणि मिखाईलची हत्या करून मृतदेह बॅगेत भरण्याची योजना होती. परंतु नाकाबंदीच्या काळात पोलिसांनी डिकी तपासली तर बिंग फुटेल अशी भीती होती.
’त्यामुळे तिने शीनाची हत्या केल्यानंतर मृतदेह रात्रभर गाडीत ठेवला आणि २५ एप्रिल २०१२ला गाडीत आपल्या शेजारी मृतदेह ठेवून प्रवास केला.
’संजीव खन्ना आणि इंद्राणीने आपल्या मध्ये शीनाचा मृतदेह ठेवला होता. हत्येपूर्वी तिने दादर येथून पाच हजारात दोन बॅगा घेतल्या होत्या. त्या बॅग विक्रेत्याची जबानी पोलिसांनी घेतली आहे.
’शीना आणि संजीव खन्नाच्या आर्थिक संबंधाबाबत तपास सुरू असून त्यांचे चॅट आणि ईमेल्सही तपासले जात आहेत.